जिल्हानिहाय एकच मंडळ स्थापन करा
By Admin | Updated: April 8, 2017 03:25 IST2017-04-08T03:25:56+5:302017-04-08T03:25:56+5:30
मुंबईसाठी एकच जिल्हानिहाय मंडळ स्थापन करण्याची मागणी अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने सरकारकडे केली

जिल्हानिहाय एकच मंडळ स्थापन करा
मुंबई : माथाडी कामगारांसाठी उद्योगनिहाय स्वतंत्र मंडळे ठेवण्याऐवजी संपूर्ण मुंबईसाठी एकच जिल्हानिहाय मंडळ स्थापन करण्याची मागणी अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने सरकारकडे केली आहे. अपुरा कर्मचारी वर्ग, पूर्णवेळ अध्यक्ष व सचिवांची उणीव यांमुळे मुंबईतील माथाडी मंडळांचा कारभार डबघाईला आला असल्याचा आरोप युुनियनने केला आहे.
युनियनच्या म्हणण्यानुसार, राज्यात ३६ माथाडी मंडळे असून त्यातील १० मंडळे एकट्या मुंबईत आहेत. मात्र यांमधील कोणत्याही मंडळांवर पूर्णवेळ अध्यक्ष आणि सचिव नेमलेला नाही. एकच अधिकारी दोन ते चार मंडळांचा कारभार पाहत असून, आठवड्यातून एखादा दिवस मंडळाच्या कार्यालयात उपस्थित असतात. अन्य कर्मचाऱ्यांचीही कार्यालयात वाणवा दिसते. परिणामी, मंडळाच्या कामकाजावर परिणाम झाला असून संबंधित माथाडी कामगारांना न्याय मिळत नसल्याचेही निदर्शनास आले आहे.
संघटनेचे सरचिटणीस अविनाश रामिष्टे यांनी सांगितले की, सरकारने प्रत्येक मंडळावर अध्यक्ष व सचिवांसह आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी युनियन सातत्याने करत आहे.
मात्र परिस्थितीत सुधारणा झाली नसून, काही मंडळांमधील कर्मचाऱ्यांची संख्या ३० टक्क्यांखाली घसरली आहे. वेळेवर पगार न होणे, मालकांकडून होणारा अन्याय दूर न होणे, निवृत्तीनंतरचे लाभ वेळेवर न मिळणे अशा अनुभवांना कामागारांना सामोरे जावे लागत आहे.
नव्या मालक व कामगारांची नोंदणी होत असून आस्थापनांची तपासणीही होत नाही. या गोष्टींचा फायदा घेऊन माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्यात
मालक मंडळी टाळाटाळ करत असल्याचा आरोपही रामिष्टे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
...तर कामगारांची ससेहोलपट थांबेल
उद्योगनिहाय स्वतंत्र मंडळ ठेवण्याऐवजी जिल्हानिहाय एकच मंडळ ठेवल्यास एकच पूर्णवेळ अध्यक्ष व सचिव सगळे काम पाहू शकतील. तसेच वेगवेगळ्या मंडळांमध्ये काम करणारे कर्मचारी एकाच छताखाली आल्यामुळे परिणामकारक काम होऊन कामगारांची ससेहोलपट थांबेल.
कार्यक्षेत्रामुळे
कार्यक्षमतेवर परिणाम!
मुंबईतील १० मंडळांचे कार्यक्षेत्र हे संपूर्ण मुंबई शहरासोबत ठाणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांपर्यंत विस्तारलेले आहे. अवाढव्य कार्यक्षेत्रामुळे मंडळाच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होत आहे. शिवाय कामगारांनाही मंडळांच्या कार्यालयात येण्यासाठी मुंबई किंवा नवी मुंबईत धाव घ्यावी लागते. त्याऐवजी मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, पालघर अशा प्रत्येक जिल्ह्यातील माथाडी कामगारांसाठी स्वतंत्र मंडळांची निर्मिती केल्यास कामात सुटसुटीतपणा येईल.
मालकांच्या कुकर्माला आळा बसेल!
काही माथाडी कामगारांच्या कामाला दोन विविध मंडळांच्या योजना लागू होतात. याचा गैरफायदा घेऊन काही मालक दोन्ही मंडळांकडे बोटे दाखवत कुठल्याच मंडळाचे आदेश पाळत नाहीत. अशा प्रकरणांना एकच मंडळ केल्यास आळा बसेल.