आपत्कालीन मदत पथके स्थापन करा, सर्व महापालिकांना आदेश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 08:14 IST2024-05-29T08:09:45+5:302024-05-29T08:14:21+5:30
आपत्कालीन विभागाच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारही उपस्थित होते.

आपत्कालीन मदत पथके स्थापन करा, सर्व महापालिकांना आदेश; मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीत जनतेला तातडीने मदत करता यावी यासाठी ठाणे महापालिकेने सुरू केलेल्या आपत्कालीन मदत पथकाच्या (टीडीआरएफ) धर्तीवर राज्यातील सर्व महापालिकांनी पथके स्थापन करावीत, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्याद्री अतिथिगृहावर आपत्कालीन विभागाची मान्सूनपूर्व आढावा बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारही उपस्थित होते.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी कोणत्याही नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी राज्यातील आपत्कालीन यंत्रणा किती सज्ज आहे याचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. राज्य आपत्कालीन दलाची आठ पथके राज्यात आहेत, त्याची संख्या वाढवावी, तसेच विभागनिहाय राज्य आपत्कालीन पथके स्थापन करावीत, असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
कुणाला कोणते आदेश?
- उल्हास नदीवरील बदलापूर बॅरेज येथील ब्रिटिशकालीन पीअर्स हटवावा, जेणेकरून महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकण्यासारखी घटना पुन्हा घडणार नाही.
- राज्यात ४८६ दरडप्रवण ठिकाणे आहेत. अशा ठिकाणी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन कायमस्वरूपी व्यवस्था करावी.
- पावसाळ्यात ज्या भागांचा संपर्क तुटेल अशा ठिकाणी औषधी, पाणी आणि धान्य पुरविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी.
- राज्यातील सीमावर्ती भागात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून मध्यप्रदेशातील संजय सरोवर, कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत त्या त्या राज्यांशी समन्वय ठेवावा.
- वादळी वाऱ्यात वीजपुरवठा सुरळीत राहावा यासाठी ऊर्जा विभागाने दक्षता घ्यावी.
- मुंबईतील रस्त्यांवरील मॅनहोलवर झाकणे आणि गर्डर बसवावेत.