Enthusiasm in the state, but also overcoming difficulties | Corona Vaccination: राज्यात उत्साह, मात्र अडचणींचाही खोडा

Corona Vaccination: राज्यात उत्साह, मात्र अडचणींचाही खोडा

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्र शासनाच्या आदेशानुसार काेरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सोमवारी सुरू झाला. मुंबईसह राज्यात सकाळपासूनच महापालिका व खासगी रुग्णालयांत ज्येष्ठ नागरिकांनी नावनोंदणी व लसीकरणासाठी गर्दी केली. ज्येष्ठांमध्ये लसीकरणासाठी मोठा उत्साह दिसून आला. विदर्भात चांगला प्रतिसाद दिसून आला. पहिल्या दिवशी  मुंबईत १९८२, नवी मुंबई ४९, ठाणे जिल्ह्यात २१९, रायगडमध्ये ९० तर पालघर जिल्ह्यात ८६ जणांनी लस घेतली.
मुंबईत सकाळापासूनच खासगी रुग्णालयात अनेक ज्येष्ठ नागरिक नावनोंदणी व लसीकरणासाठी गेले होते. मात्र, केंद्र शासनाच्या कोविन ॲपमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने त्यांची नावनोंदणी होऊ शकली नाही. अनेक ठिकाणी सर्व्हर सुरू नसल्याने लसीकरण होणार नसल्याचे सांगण्यात आले. परिणामी ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत बसावे लागले. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी लस न घेताच माघारी परतण्याचा निर्णय घेतला.


पालिका आणि खासगी लसीकरण केंद्र मिळून मुंबईत  एकूण आठ रुग्णालयांमध्ये दिवसभर लसीकरण प्रक्रिया राबविण्यात आली. मुलुंड, नेस्को, सेव्हन हिल्स, दहिसर आणि वांद्रे येथील जम्बो कोबड केंद्रांमध्ये खोळंबलेले लसीकरण दुपारनंतर सुरू झाले. भर उन्हात ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत रहावे लागले. शिवाय नोंदणी, लसीविषयी गैरसमज आणि माहितीचा अभाव असल्याने बऱ्याच केंद्रांमधून लस न घेताच ज्येष्ठ नागरिक माघारी परतले. लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक लसीकरणासाठी आले असताना या केंद्रांवर मार्गदर्शन व चौकशी कक्ष नसल्याने त्यांचा गोंधळ उडाला. त्याचप्रमाणे, हिंदू महासभा रुग्णालय, एसआरसीसी आणि के. जे सोमैया रुग्णालयातही कोविन संकेतस्थळावर नोंदणी न करताही उच्च मध्यमवर्गीय लाभार्थ्यांनी लसीकरणासाठी गर्दी केली. त्यामुळे येथील रुग्णालय प्रशासन व्यवस्थापनाने वॉक इन नोंदणी प्रक्रिया सुरू केली, मात्र या प्रक्रियेया वेळ लागत असल्याने कमी जणांचे लसीकरण करण्यात आले. या लसीकरण केंद्रांवर आलेल्या लाभार्थ्यांनाही लसीकरण प्रक्रियेविषयी नाराजी व्यक्त केली.


मात्र, केंद्र शासनाच्या कोविन ॲपमध्ये तांत्रिक बिघाड असल्याने काहींची नावनोंदणी होऊ शकली नाही. अनेक ठिकाणी सर्व्हर सुरू नसल्याने लसीकरण होणार नसल्याचे सांगण्यात आले. परिणामी ज्येष्ठ नागरिकांना ताटकळत बसावे लागले. त्यामुळे काही जण लस न घेताच माघारी परतले. 
मुंबईत तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण प्रक्रियेत केवळ १ हजार ९८२ लाभार्थ्यांनी लसघेतली आहे मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार , शहर उपनगरातील एकूण आठ लसीकरण केंद्रावर ही प्रक्रिया पार पडली. यात  ४५ ते ५० वयोगटातील २६० लाभार्थ्यांनी तर ६० हून अधिक वय असणाऱ्या १ हजार ७२२ लाभार्थ्यांना लस देण्यात आली आहे.


नवी मुंबईत पहिल्या दिवशी ४९ ज्येष्ठांनी घेतली लस 
नवी मुंबई महापालिकेच्या नेरूळ आणि वाशी रूग्णालयात सोमवारपासून तिसऱ्या टप्याच्या लसीकरणाला सुरूवात झाली. पहिल्या दिवशी ४९ ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली. लसीकरणासाठी पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया वेळकाढूपणाची असल्याने प्रत्यक्ष लसीकरणाला दुपारी १ वाजल्यापासून सुरूवात झाली. दोन्ही रूग्णालयात ४९ ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरण करून घेतल्याचे महापालिकेने सांगितले.

ठाणे जिल्हा रुग्णालयात २१९ ज्येष्ठांनी घेतली लस
ठाणे जिल्ह्यात १३ शासकीय रुग्णालये, ३३ प्राथमिक केंद्रे, महापालिका, नगरपालिका हॉस्पिटल, ईएसआयसीएस रुग्णालयांत लसीकरणाची सोय आहे. या सर्व शासकीय केंद्रांमध्ये लसीकरण सुरू झाले आहे. सोमवारी संध्याकाळपर्यंत एकट्या जिल्हा रुग्णालयात २१९ ज्येष्ठांना लस टोचण्यात आली. इतर शासकीय रुग्णालयांची आकडेवारी उशिरापर्यंत प्राप्त झालेली नव्हती. मात्र, बहुसंख्य खासगी रुग्णालयांत अद्याप लसीकरण सुरू झालेले नाही. तेथील कर्मचाऱ्यांना दोन दिवस प्रशिक्षण देण्यात येणार असून त्यानंतर तेथील लसीकरणास सुरुवात होईल, असे सांगण्यात आले.
 
रायगडमध्ये लसीकरणाला अल्प प्रतिसाद
रायगड जिल्ह्यात लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळाला. पनवेल पालिका क्षेत्रात ९० जणांना लसीकरण करण्यात आले. यामध्ये ७४ जेष्ठ नागरिकांचा समावेश होता. ४५ पुरुष व २९ महिलांचा समावेश आहे. तर उर्वरित १६ जणांना दुसरा डोस देण्यात आला.

पालघर जिल्ह्यात पहिल्या दिवशी ८६ जणांना लस
 पालघर जिल्ह्यात काेविड लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याच्या पहिल्या दिवशी सरकारी दहा लसीकरण केंद्रात ६० वर्षे वयोगटावरील एकूण ८६ जणांना लस देण्यात आली. पहिल्याच दिवशी या माेहिमेत नेटची समस्या आल्याने अडचणींचा सामना करावा लागला. काही ज्येष्ठ रुग्णांना घरी पाठवून त्यांना मंगळवारी सकाळी परत लसीकरण केंद्रात बाेलावण्यात येणार आहे. 

ॲपमध्ये बिघाडीच्या आल्या तक्रारी
n विदर्भात हेल्थ वर्कर व फ्रंटलाइन वर्करच्या तुलनेत मोठ्या प्रतिसादाने अनेक केंद्रांवरील नियोजन फसले. मराठवाड्यात ॲपवर नोंदणी करण्यास येणारे अडथळे, प्रशिक्षणाचा अभाव, डॉक्टरांचे प्रमाणपत्र नसणे यामुळे गोंधळ दिसला. पुण्यातही सामान्यांचे लसीकरण अडथळ्यांची शर्यत ठरली. 
n सहा वाजेपर्यंत उपलब्ध माहितीनुसार राज्यात नागपूर जिल्ह्यात ५८२, गोंदियात १६५, वाशिमला ९२, अमरावतीत ८८, परभणी जिल्ह्यात ४३४, औरंगाबादला २३७, धुळ्यात ६४ तर जळगावला २३ ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Enthusiasm in the state, but also overcoming difficulties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.