सरकारी नोकरीचा कधीही राजीनामा द्या, कधीही मागे घ्या...; महाराष्ट्रात नवा नियम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 05:42 AM2022-05-10T05:42:35+5:302022-05-10T05:50:53+5:30

२००५ नंतर सेवेत आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी असतील अटी

Employee can anytime give resignation of government job, anytime they withdraw in Maharashtra new Rule Govt jobs | सरकारी नोकरीचा कधीही राजीनामा द्या, कधीही मागे घ्या...; महाराष्ट्रात नवा नियम

सरकारी नोकरीचा कधीही राजीनामा द्या, कधीही मागे घ्या...; महाराष्ट्रात नवा नियम

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांना शासकीय सेवेचा राजीनामा दिला तरी त्यांना तो मागे घेता येईल. त्यासाठी कुठल्या अटी असतील, याबाबतचे आदेश राज्य सरकारने सोमवारी जारी केले. 

१ नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी कोणी राजीनामा दिलास तो मागे घेण्यासंबंधीचे सुस्पष्ट धोरण आतापर्यंत नव्हते. ज्या कर्मचाऱ्यांना जुनी सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यात येत नाही, अशा कर्मचाऱ्यांचा राजीनामा मागे घेण्यासंबंधीचे धोरण आता निश्चित करण्यात आले आहे. राजीनामा दिलेल्या कर्मचाऱ्याने पुन्हा सेवेत घेण्याची विनंती केली असल्यास ती स्वीकारण्याचे काही निकष निश्चित करण्यात आले आहेत. 

शासकीय कर्मचाऱ्याने त्याची सचोटी, कार्यक्षमता किंवा वर्तणूक याशिवाय अन्य काही कारणास्तव राजीनामा दिलेला असला पाहिजे. ज्या कारणाने त्याने राजीनामा दिला, त्या परिस्थितीमध्ये महत्त्वाचा बदल झाल्यामुळे त्याने राजीनामा मागे घेण्याची विनंती केलेली असली पाहिजे. राजीनामा अमलात येण्याची तारीख आणि तो मागे घेण्याबद्दल विनंती केल्याची तारीख यांच्या दरम्यानच्या कालावधीत संबंधित कर्मचाऱ्याची वर्तणूक कोणत्याही प्रकारे अनुचित असता कामा नये, असे नियम निश्चित करण्यात आले आहेत.

असे आहेत नियम
nएखाद्या कंपनीत किंवा सरकारी नियंत्रणाखालील वा सरकारी अनुदानावरील संस्थेत रुजू होण्यासाठी शासकीय सेवेचा राजीनामा दिलेला असेल तर तो मागे घेतला जाणार नाही.
nराजीनामा अंमलात येण्याची तारीख आणि तो मागे घेण्यास परवानगी दिल्यामुळे त्या व्यक्तीला कामावर रुजू होण्यास मुभा दिल्याची तारीख यांच्या दरम्यानचा अनुपस्थितीचा कालावधी ९० दिवसांपेक्षा अधिक असता कामा नये. 
nराजीनामा दिल्याने रिक्त झालेले पद राजीनामा परत घेतल्यानंतर रिक्त असणे आवश्यक असेल.

मंत्रालय अखेर निर्बंधमुक्त; १८ पासून सामान्यांना प्रवेश
राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध पूर्णत: हटविलेले असतानाही राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्रालयात सामान्य माणसांना अजूनही प्रवेश मिळत नव्हता. मात्र, आता १८ मे पासून हा प्रवेश देण्याचा निर्णय गृह विभागाने सोमवारी घेतला. ‘लोकमत’ने ११ एप्रिलच्या अंकात याबाबतचे वृत्त दिले होते.
मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या प्रवेशासाठी पूर्वी असलेली व्हीआरएमएस (व्हिजिटर पास मॅनेजमेंट सिस्टीम) १८ तारखेपासून पुन्हा लागू केली जाईल. 

सामान्यांना मंत्रालयात प्रवेश दिला जात नसल्यामुळे येत असलेल्या अडचणींकडे लोकमतने लक्ष वेधले होते. त्यावर, मंत्रालय प्रवेशावरील निर्बंध हटवावेत आणि सामान्यांना प्रवेश द्यावा यासाठीचा प्रस्ताव आपल्या विभागाकडून पाठविला जाईल, अशी ग्वाही सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्ता भरणे यांनी दिली होती. 
प्रस्ताव गृह विभागाने मंजूर केला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील त्यास मान्यता दिली आहे. आता मंत्रालयाच्या गेटवर पास तयार करून सामान्यांना मंत्रालयात जाता येईल.

Web Title: Employee can anytime give resignation of government job, anytime they withdraw in Maharashtra new Rule Govt jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.