१०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यावर ठाम - ऊर्जामंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 06:16 IST2020-11-21T06:15:36+5:302020-11-21T06:16:12+5:30
लॉकडाऊन काळातील बिलांना माफी नाहीच

१०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यावर ठाम - ऊर्जामंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या आधीच्या घोषणेवर आपण अजूनही ठाम असल्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत स्पष्ट केले. मात्र, लॉकडाऊनच्या काळात आलेल्या वाढीव बिलांबाबत माफी वा सवलत देण्यास मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिला.
लॉकडाऊन काळातील वाढीव बिले माफ करणार का या प्रश्नात ते म्हणाले, मीटर रीडिंगप्रमाणे बिले भरली गेलीच पाहिजेत. मागच्या सरकारने कर्जाचा डोंगर उभा करून ठेवला आहे. त्यामुळे आजची स्थिती वीजबिल माफीसारखी नाही. आतापर्यंत ६९ टक्के ग्राहकांनी बिले भरली आहेत. उर्वरित ३१ टक्के डिसेंबर-जानेवारीपर्यंत भरतील.
ऊर्जा विभागाने १०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्याबाबत नेमलेल्या अभ्यासगटचा अहवाल कोरोनामुळे आला नाही. पण ही वीज माफ केल्याचे तुम्हीह पाहाल, असेही ते म्हणाले.
‘ती’ बिले भरण्याचा शब्द भाजप नेत्यांनी द्यावा
भाजपा नेत्यांना वाढीव बिलांबाबत आक्षेप असेल तर त्यांनी माझ्या कार्यालयाकडे ती द्यावीत. मी त्यांची तपासणी करेन. पण बिले वाढीव नसल्याचे सिद्ध झाले, तर ती भरू, असा शब्द भाजप नेत्यांनी द्यावा, असे आव्हान राऊत यांनी दिले.