गोशाळेत ढवळीने घेतला अखेरचा श्वास! खड्ड्यात पडून गाय झाली होती जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 09:42 AM2022-05-10T09:42:38+5:302022-05-10T09:43:38+5:30

‘लोकमत’च्या बातमीची दखल घेऊन डॉ. सचिन म्हापणकर आणि डॉ. दळवी हे ८० किमी अंतरावरून दुसऱ्या दिवशी तेलमच्या घरी पोहोचले. त्यांनी ढवळीवर उपचार सुरू केले. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आणि ढवळीने सुंदर अशा एका गाईला जन्म दिला. तिचे नाव ‘गोकुळी’ असे ठेवण्यात आले.

Emotional Story: death of cow who was injured after falling into the pit | गोशाळेत ढवळीने घेतला अखेरचा श्वास! खड्ड्यात पडून गाय झाली होती जखमी

गोशाळेत ढवळीने घेतला अखेरचा श्वास! खड्ड्यात पडून गाय झाली होती जखमी

googlenewsNext

- विशाल हळदे
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वासराला जन्म दिल्यानंतर साधारणत: आठ दिवसांनी शहापूर तालुक्यातील विहिगावच्या ढवळी गायीने सोमवारी भिवंडीजवळच्या गोशाळेत अखेरचा श्वास घेतला. १५ दिवसांपूर्वी ती गाभण असताना गावाजवळ चरायला गेली असता, खड्ड्यात पडून जखमी झाली होती.

कसारा घाटातून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्यावर विहिगाव आहे.  या विहिगावातील ढवळी गाय गाभण असताना चरायला गेली असता टेकडीवरून आठ फूट खोल खड्ड्यात पडली. त्यामुळे तिच्या कमरेचे हाड मोडले. तुकाराम तेलम यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच गायीवर अवलंबून होता. ढवळी जखमी झाल्याचे समजताच, तेलम कुटुंबीयांनी बैलगाडीत ठेवून स्वत: बैलगाडी ओढत घरी आणली. ‘लोकमत’मध्ये ही बातमी प्रकाशित होताच समाजमन ढवळून निघाले.

‘लोकमत’च्या बातमीची दखल घेऊन डॉ. सचिन म्हापणकर आणि डॉ. दळवी हे ८० किमी अंतरावरून दुसऱ्या दिवशी तेलमच्या घरी पोहोचले. त्यांनी ढवळीवर उपचार सुरू केले. डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आणि ढवळीने सुंदर अशा एका गाईला जन्म दिला. तिचे नाव ‘गोकुळी’ असे ठेवण्यात आले.

ढवळीच्या कमरेचे माकडहाड मोडल्यामुळे जवळजवळ दहा दिवस ती जागेवरच बसून होती. त्यातून गाईला एकाबाजूला लकवा होईल, अशी भीती डॉ. म्हापणकर यांनी व्यक्त केली. त्यामुळे पुढील उपचारासाठी ढवळीला भिवंडी तालुक्यातील अनगाव येथील गोपाळ गोशाळेत हलविण्यात आले.  या गोशाळेत ढवळीवर उपचार करण्यात आले. पहिले तीन, चार दिवस व्यवस्थित गेले. परंतु अचानक ढवळीने चारा खाणे बंद केले. तिच्या कमरेत मोठ्या प्रमाणात पाणी झाल्याने तिला असह्य वेदना होत होत्या. त्यातच ‘गोकुळी’शी ताटातूट झाल्याने ती खचली होती. अशातच तिने सोमवारी सकाळी शेवटचा श्वास घेतला.

गोशाळेतच अंत्यसंस्कार
गोशाळेने ढवळीचे अंत्यसंस्कार गोशाळेतच केले. गोशाळेचे काही नियम असतात आणि त्या नियमांचे पालन करूनच ढवळीला अखेरचा निरोप देण्यात आला, असे डॉ. सचिन म्हापणकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

ढवळी गेली, पण 
छबी सोडून गेली

‘लोकमत’ला आलेली बातमी वाचूनच आम्ही विहिगावला पोहोचलो. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न केले. त्यामुळेच ढवळीने जन्म दिलेल्या वासराला, गोकुळीला आम्ही वाचवू शकलो. ढवळीच्या कमरेला जबर घाव झाला होता. गोशाळेत उपचार सुरू असतानाही, मी तेथील कर्मचाऱ्यांच्या नियमित संपर्कात होतो. ढवळीची जिद्द होती म्हणून तिने वासराला जन्म दिला. त्यासाठी तिने किती वेदना सहन केल्या, हे तिलाच माहिती. अखेर ढवळी गेली, पण तिची छबी सोडून गेली.
- डाॅ. सचिन म्हापणकर

ढवळी आमच्या कुटुंबातील सदस्य होती. ती गेली. आता यापुढे आम्ही कुणापुढेच हात पसरणार नाही. तिच्या वेदना बघवत नव्हत्या. गोकुळी हे तिचेच रूप आहे. आता तिची देखभाल आम्ही व्यवस्थित करू.
- तुकाराम तेलम, ग्रामस्थ

Web Title: Emotional Story: death of cow who was injured after falling into the pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cowगाय