Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आपत्कालीन यंत्रणेची पोलखोल!
By सूर्यकांत वाघमारे | Updated: February 6, 2026 08:04 IST2026-02-06T08:00:57+5:302026-02-06T08:04:50+5:30
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी गॅस टँकरच्या झालेल्या अपघातामुळे अभूतपूर्व वाहतूककोंडी झाली.

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील आपत्कालीन यंत्रणेची पोलखोल!
सूर्यकांत वाघमारे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी गॅस टँकरच्या झालेल्या अपघातामुळे अभूतपूर्व वाहतूककोंडी झाली. त्यानंतर टँकरमधील वायू गळती रोखण्यात प्रशसनाला अपयश आल्याने तब्बल अडीच दिवस वाहतूक ठप्प झाली. यामध्ये अडकलेल्या प्रवाशांना अन्न-पाण्यापासून ते शौचालयापर्यंतच्या समस्यांना सामोरे जावे लागले.
द्रुतगती मार्गावर आपत्कालीन यंत्रणाच सक्षम नसल्याची बाब आता अधोरेखित झाली आहे. ‘आयआरबी’च्या यंत्रणेने या समस्येसमोर हात टेकल्यानंतर महामार्ग पोलिसांनी ‘बीपीसीएल’ कंपनीकडे मदत मागितली असता, त्यांनी गॅस गळती रोखली. या अडीच दिवसांत कोंडीत अडकून पडलेल्या प्रवाशांच्या झालेल्या जाचातून प्रशासन बोध घेईल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पर्यायी सुविधा आवश्यक
महामार्गावर ज्वलनशील पदार्थांची हाताळणी करणाऱ्या यंत्रणेसह कोंडीत अडकलेल्यांना सुरुवातीच्या काही तासांतच बाहेर काढण्याची उपाययोजना नसल्याचेही दिसून आले. कळंबोली ते देहूरोड या ९४ किलोमीटरच्या अंतरात आपत्कालीनप्रसंगी वाहने दुसऱ्या मार्गिकेवर वळवण्यासाठी दोन्ही मार्गांत ठिकठिकाणी मार्ग आवश्यक आहेत.
‘आयआरबी’ने साधली संधी
आडोशी बोगद्याजवळ अपघातामुळे कोंडी झाल्याचे माहीत असतानाही टोलनाक्यावरून पुणेकडून मुंबईला जाणारी वाहने सोडल्याने कोंडी वाढली.
टोलनाक्यावरूनच वाहनांना अपघाताची कल्पना देऊन परत पाठवले असते तर हजारो प्रवाशांचे हाल टळले असते. मात्र, ‘आयआरबी’ने टोल आकारून वाहने पुढे पाठवली. शिवाय कोंडीतून सुटून परत जातानाही टोल आकारून कमाई केली.
अपघातानंतर ‘आयआरबी’च्या यंत्रणेकडे गॅस गळती रोखण्याची सक्षम यंत्रणा नव्हती. परिणामी एका संस्थेच्या माध्यमातून ‘बीपीसीएल’च्या पथकाला बोलवण्यात आले. त्यांनी गुरुवारी पहाटे दीडच्या सुमारास गॅस गळती रोखल्यानंतर अपघातग्रस्त टँकर हटवून वाहतूक सुरू करण्यात आली. तानाजी चिखले, पोलिस अधीक्षक, महामार्ग पोलिस
दुसऱ्या दिवशी पाणी, बिस्कीट
वाहतूककोंडीत अडकलेल्या प्रवाशांसाठी लोणावळा, खंडाळा येथून खाद्यपदार्थ विक्रेत्यांना पाठवून अन्न-पाण्याची सोय करून देणे शक्य होते.
मात्र, त्याकडे यंत्रणेचे लक्ष न गेल्याने महामार्ग पोलिसांना आपण त्यासंबंधीची कल्पना दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणी, बिस्कीट पुरवले गेल्याचे रस्ता सुरक्षा अभियानाचे वक्ते विनय मोरे यांनी सांगितले.
ठाण्यात दूध संपले, भाजीपाला टंचाईशी झाला सामना
द्रुतगती मार्गावरील गॅस टँकर अपघातानंतर झालेल्या वाहतूककोंडीमुळे ठाण्यातील दूध पुरवठ्यावर गुरुवारी परिणाम झाला. या शहरात सुमारे ५० टक्के दूध कमी प्रमाणात उपलब्ध झाले. सकाळी ११ नंतर अनेकांना दूध न मिळाल्याने दुकानातून माघारी फिरावे लागले. तर, भाजीपाला पुरवठ्यावरही परिणाम झाला. गोकुळ आणि वारणाच्या दुध वितरणावर सर्वाधिक परिणाम झाला. तर चितळे डेअरीचे दूध ठाण्यात आले नाही, अशी माहिती ठाणे जिल्हा दूध विक्रेते कल्याणकारी संघटनेचे सहसचिव पांडुरंग चोडणेकर यांनी दिली. वसई-विरार परिसरात दुधाचा पुरवठा तुलनेने सुरळीत होता. शुक्रवारी दूध पुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा आहे. भाजीपाला पुरवठ्यावरही परिणाम झाला होता. नाशिकमधून येणाऱ्या भाज्यांचा पुरवठा सुरळीत होता, असे भाजी विक्रेते भगवान तुपे यांनी सांगितले.