इलेक्टोरल बाँड PM मोदींनी चालवलेले जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट; राहुल गांधींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2024 08:10 PM2024-03-15T20:10:47+5:302024-03-15T20:11:48+5:30

'कधी ना कधी भाजपाची सत्ता जाईल आणि त्यावेळी जी कारवाई होईल, ती अत्यंत कठोर असेल.'

Electoral Bond: 'World's Biggest Extortion Racket Run by PM Modi', Rahul Gandhi's Serious Allegation | इलेक्टोरल बाँड PM मोदींनी चालवलेले जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट; राहुल गांधींचा घणाघात

इलेक्टोरल बाँड PM मोदींनी चालवलेले जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट; राहुल गांधींचा घणाघात

Rahul Gandhi on Electoral Bond: इलेक्टोरल बाँड प्रकरणावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. मोठ्या कंपन्यांकडून पैसे उकळण्याचे हे एक साधन आहे. ही योजना म्हणजे जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट. ईडी-सीबीआय तपास करत नाहीत, ते भाजपसाठी वसुली करतात. या पैशांचा वापर देशातील पक्ष फोडण्यासाठी होतो, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. भारताच्या इतिहासातील या सर्वात मोठ्या भ्रष्टाचारात पंतप्रधान मोदींचा हात आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

जगातील सर्वात मोठा भ्रष्टाचार
भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान संध्याकाळी भिवंडी येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी या घोटाळ्यावरून भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर हल्ला केला. ते म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वर्षांपूर्वी सुरू केलेली इलेक्टोरल बाँड योजना जगातील सर्वात मोठे खंडणी रॅकेट आहे. हे जगातील सर्वात मोठे भ्रष्टाचाराचे प्रकरण आहे. हे मोठ्या कंपन्यांकडून पैसे उकळण्याचे साधन आहे. ज्या कंपन्यांवर तपास यंत्रणांनी कारवाई केली, त्यांनीच भाजपला देणगी दिली आहे. सीबीआय, ईडी, आयटी ही भाजप आणि आरएसएसची शस्त्रे आहेत. या आता भारताच्या तपास यंत्रणा राहिल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालय याची चौकशी करेल अशी अपेक्षा आहे."

'यापेक्षा मोठे देशविरोधी कृत्य नाही'
राहुल गांधी पुढे म्हणतात, "सुप्रीम कोर्टाने सांगितले की, नरेंद्र मोदींनी लॉन्च केलेल्या इलेक्टोरल बाँड्सचा डेटा सार्वजनिक करावा. त्यानंतर देशातील बड्या कॉर्पोरेट कंपन्यांनी भाजपला हजारो कोटी रुपये दिल्याची आकडेवारी समोर आली. हे देशविरोधी कृत्य आहे. यापेक्षा मोठे देशविरोधी कृत्य असू शकत नाही. भाजप सरकार ईडी, सीबीआय, आयटीवर दबाव टाकून कंपन्यांकडून पैसे उकळते. ज्या कंपन्यांवर तपास यंत्रणांनी कारवाई केली जाते, त्या कंपन्या भाजपला देणगी देतात. संपूर्ण देशाची व्यवस्था भ्रष्टाचारात ढकलण्यासारखे आहे. ही पंतप्रधान मोदींची आयडिया आहे. हे नितीन गडकरींनी नाही, तर पंतप्रधान मोदींनी केले आहे."

काँग्रेसलाही देणगी मिळाली, पण...

काँग्रेससह विरोधी पक्षांनाही या बाँडचे पैसे मिळाले आहेत या प्रश्नावर बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "यातील सर्वात जास्त पैसा भाजपाला मिळालेला आहे. १०-२० टक्के पैसा विरोधी पक्षांना मिळाला असेल परंतु काँग्रेसकडे हायवे किंवा इतर कंत्राट देण्याचे अधिकार नाहीत. सीबीआय, ईडी, आयकर विभाग यांच्यावर विरोधी पक्षांचे नियंत्रण नाही ते या सर्व संस्था पंतप्रधानांच्या नियंत्रणात आहेत असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले."

कठोर कारवाई होणार...

"काही कंपन्यांना राष्ट्रीय महामार्ग, रस्ते, टनेलचे कंत्राट दिले त्या कंपन्यांकडूम मोठी वसुली केली आहे. हा गंभीर गुन्हेगारीचा प्रकार असून राष्ट्रद्रोह आहे. या घोटाळ्यात नितीन गडकरींचा सहभाग नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचाच हात आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात शेल कंपन्यांचा वापर केला आहे. सर्वच्या सर्व यंत्रणाच वसुलीच्या कामाला जुंपल्या आहेत. भाजपाची कधी ना कधी सत्ता जाईल आणि त्यावेळी जी कारवाई होईल, ती अत्यंत कठोर असेल", असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Web Title: Electoral Bond: 'World's Biggest Extortion Racket Run by PM Modi', Rahul Gandhi's Serious Allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.