अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 06:34 IST2025-11-05T06:33:47+5:302025-11-05T06:34:07+5:30
२ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबरला निकाल, थेट लोकांमधून निवडले जाणार २८८ नगराध्यक्ष

अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मतदार याद्यातील घोळ, दुबार मतदार, चुकीचे पत्ते लक्षात घेऊन राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्यानंतरच घेण्यात याव्यात, अशी मागणी विरोधक करत असतानाच मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींसाठी (एकूण २८८) निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये सदस्यपदासाठी आणि थेट नगराध्यक्षपदासाठी २ डिसेंबर रोजी मतदान; तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यामुळे आता सर्व नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात मंगळवारपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे.
दुबार नावांबाबत काय करणार?
राज्य निवडणूक आयोगाने टूलच्या आधारे संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर दोन स्टारचे (**) चिन्ह लावले आहे. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात येईल. तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याविषयी त्याच्याकडून अर्ज भरून घेतला जाईल.
दुबार मतदाराची काटेकोर ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल. तसेच दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान करणार नाही असे हमीपत्रही त्याच्याकडून घेतले जाईल, असे वाघमारे यांनी सांगितले. मात्र, संभाव्य दुबार मतदाराची नेमकी संख्या सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली.
३१ जानेवारीपूर्वीच पार पडणार सर्व स्थानिक निवडणुका
विरोधक निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी करत असल्याबाबत विचारले असता, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही निवडणुका घेत असून, न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याचे वाघमारे यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषद व महापालिकांच्या निवडणुकाही ३१ जानेवारीपूर्वी घेण्याचे नियोजन आयोगाने केल्याचे स्पष्ट होते.
व्हीव्हीपॅटचा वापर नाही
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरण्याबाबत नियमात तरतूद नाही. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक बहुप्रभाग पद्धतीने होणार आहे. मतदारांना एकापेक्षा जास्त वेळ मतदान करावे लागणार आहे. तांत्रिकदृष्ट्याही व्हीव्हीपॅट वापरता येणार नाही, असे वाघमारे यांनी स्पष्ट केले.
