मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 15:50 IST2025-12-22T14:40:11+5:302025-12-22T15:50:42+5:30
पराभवातून आत्मचिंतन करावे लागेल. पराभवातून शिकणे आणि पुढे जिंकणे हेच महत्त्वाचे आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.

मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
नागपूर - राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदेचा निकाल समोर आला आहे. या निकालात भाजपा नंबर वनचा पक्ष म्हणून पुढे आली आहे. परंतु ज्याठिकाणी भाजपाचा गड मानला जातो त्या विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात भाजपाचा मोठा पराभव झाला. या पराभवानंतर माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला. त्यावरून आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट भाष्य करत आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे. मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा काही संबंध नसतो असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, सुधीर भाऊंची भावना योग्य आहे. परंतु तांत्रिकपणे मंत्रिपद असते तर जिंकलो असतो असं नसते. मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा काही संबंध नसतो. आम्हाला थोडे बळ, पाठबळ दिले पाहिजे ही भावना मुनगंटीवारांची आहे ते बरोबर आहे. देवेंद्र फडणवीस कायम सुधीर मुनगंटीवारांना पाठबळ देत असतात. मुनगंटीवारांना मजबूत ठेवले आहे. आता यावेळी ते मंत्री बनू शकले नाहीत परंतु सुधीरभाऊ महाराष्ट्राचे नेते आहेत. राज्याचे माजी अध्यक्ष आहेत. राज्यात सुधीरभाऊ कुठेही गेले आणि त्यांना कुणी स्वीकारणार नाही असं नाही. महाराष्ट्रातील जनतेला त्यांचे नेतृत्व मान्यच आहे. त्यामुळे ते कुठे मागे नाही. त्यांच्या मागे आम्ही सर्व आहोत. देवेंद्र फडणवीस आहेत, केंद्रातील आमचे नेते आहेत. पंतप्रधान, अमित शाह स्वत: सुधीर भाऊंना मजबुतीने नेण्याचा प्रयत्न करतायेत. मुनगंटीवारांनी फक्त त्यांच्या भावना बोलून दाखवल्या पण नाराजीचा आणि निकालाचा काय संबंध नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच चंद्रपूरमध्ये आम्ही फारच मागे गेलो, यवतमाळमध्ये २ ठिकाणी मागे आहे. वर्ध्यात काही ठिकाणी मागे पडलो. अपेक्षित यश आले नाही. चंद्रपूरचा पराभव मोठा झाला. पूर्व विदर्भात असं व्हायला नको यासाठी आम्हाला आत्मचिंतन करावे लागेल. चंद्रपूर, वर्धा हा भाजपाचा गड आहे. नागपूरमध्ये २७ पैकी २२ भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आलेत. दीड कोटी सदस्य संख्या असलेली भाजपा आहे. १ लाख सक्रीय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे हा विजय झाला आहे. चंद्रपूरमध्ये थोडे आम्हाला आत्मचिंतनाची गरज आहे. पराभवातून आत्मचिंतन करावे लागेल. पराभवातून शिकणे आणि पुढे जिंकणे हेच महत्त्वाचे आहे. सुधीरभाऊंशी आम्ही बोलू. आत्मचिंतन करू. त्यातून शिकू आणि त्यातून आम्ही चंद्रपूर महापालिका निवडणूक जिंकू शकतो असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला. ABP ला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वांना सोबत घेतले. माझ्यावर निवडणूक प्रभारी जबाबदारी दिली. त्यामुळे नगरपालिका निवडणुकांमध्ये जो विजय झाला तो सामुहिक आहे. फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात डबल इंजिनने विकास होऊ शकतो हा लोकांना विश्वास आहे. या निवडणुकीत एकत्रित लढल्याचा परिणाम विजयातून दिसतो. विदर्भात १०० पैकी ५९ ठिकाणी नगराध्यक्ष भाजपाचा बनला. महाराष्ट्रातही आम्ही नंबर १ आहोत. जवळपास साडे तीन हजाराहून लोकप्रतिनिधी निवडून आले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात मोठे यश भाजपाला मिळाले आहे. ५१ टक्के मते भाजपालाच मिळतील असा विश्वास होता. विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीने ही वाटचाल आहे. देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्र व्हिजन जनतेने स्वीकारले आहे अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी भाजपाच्या विजयावर दिली.
महापालिकेत महायुतीने लढू, ५१ टक्के नगरसेवक निवडून आणणार
महापालिकेतही ५१ टक्के मते मिळतील, ५१ टक्क्याहून अधिक नगरसेवक निवडून येतील. दोन तृतीयांश नगरसेवक महायुतीचे निवडून येतील. भाजपा-सेना महायुतीने लढतोय. काही ठिकाणी अजितदादा सोबत आहे. त्यामुळे आमच्या मित्रपक्षात वाद नाही. वेगळे लढायचे असेल तर आम्ही चर्चा करून निर्णय घेतो. महापालिका, जिल्हा परिषदेत आमची युती होणार आहे. २९ महापालिकेसाठी आम्ही शिवसेनेसोबत बोलणी सुरू आहे असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं.