Maharashtra News Marathi: मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचले आहे. दिल्लीत माध्यमांशी बोलताना खासदार राऊत शिंदेंच्या पुढील राजकारणाबद्दल भविष्यवाणी केली. एकनाथ शिंदे यांचे दोन वर्षांचे युग संपले आहे. आता त्याचा पक्षही भाजप फोडू शकतो, असे राऊत म्हणाले.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, "शिंदेंचं युग संपले आहे. दोन वर्षांचं होतं. त्यांची गरज होती, ती पूर्ण झाली आहे; आता त्यांना फेकून देण्यात आले आहे. आता शिंदे या राज्यात कधीच मुख्यमंत्री बनणार नाहीत. हे लोक शिंदेंचा पक्षही फोडू शकतात. भाजपची राजकारणात कायम ही भूमिका राहिली आहे. जे लोक त्यांच्यासोबत काम करतात, त्यांचा पक्ष फोडतात. संपवतात."
महायुतीतील गडबड उद्यापासून दिसायला लागेल -राऊत
"आजपासून देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होतील. त्यांच्याकडे बहुमत आहे. बहुमत असूनही १५ दिवसांपासून हे सरकार स्थापन करू शकले नाही. याचा अर्थ असा आहे की, पक्षात किंवा त्यांच्या महायुतीमध्ये काही ना काही गडबड आहे. आणि उद्यापासून ही गडबड आपल्याला दिसायला लागेल", असे म्हणत राऊतांनी महायुतीत धुसफूस सुरू असल्याचा दावा केला.
"हे सगळे महाराष्ट्र किंवा देशाच्या हितासाठी काम करत नाहीयेत. हे आपापला जो स्वार्थ आहे, त्या स्वार्थासाठी हे लोक एकत्र आलेले आहेत. आणि सरकार चालवण्याची भाषा करतात, त्यात महाराष्ट्राचं हित काहीच नाहीये", असे म्हणत राऊतांनी महायुतीच्या प्रमुख नेत्यांवर टीका केली.
लोकांना निकाल मान्य नाहीये -संजय राऊत
"जो निकाल महाराष्ट्रात लागला आहे, त्याविरोधात राज्यात अनेक गावात लोक रस्त्यावर उतरले आहेत की, आम्हाला हा निकाल मान्य नाहीये. तरीही राज्याला मुख्यमंत्री मिळत आहे. आज शपथ घेतील. आम्ही त्यांचं अभिनंदन करतो. येणारा काळ जो तुम्हाला (देवेंद्र फडणवीस) मिळेल, त्यात महाराष्ट्राच्या हितासाठी काम करावं", असेही संजय राऊत म्हणाले.