मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने राज्यातील राजकारणात बऱ्याच मोठ्या घडामोडी घडत आहेत. अलीकडेच ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू होत्या त्यातच मंत्री उदय सामंत हे आज सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी पोहचले. सामंत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. गेल्या काही दिवसांतील उदय सामंत आणि राज ठाकरे यांची ही चौथी भेट आहे. त्यामुळे शिंदेसेना आणि मनसे यांच्यात युतीची चर्चा सुरू आहे का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र राज ठाकरेंसोबतच्या भेटीत राजकीय नाही तर इतर विषयांवर चर्चा झाली असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे.
या भेटीनंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात सामंत म्हणाले की, सकाळी या भागात काही कामानिमित्त आलो होतो. त्यावेळी मी स्वत: राजसाहेबांना फोन करून भेटीची विनंती केली. त्यानंतर इथं आलो. राज ठाकरेंशी गप्पा मारल्यानंतर अनेक विषय कळतात. मुंबईच्या विकासाबाबत चर्चा होते. जी काही चर्चा झाली. त्यात पुढे कसे जायचे त्यावर विचार केले जातात. त्याशिवाय तुमच्या मनात जे इतर राजकीय शंका आहे. त्यावर कसलीही चर्चा झाली नाही. चहा प्यायलो, खिचडी खाल्ली आणि निघालो. मुंबई महापालिकेबाबत चर्चा झाली असती तर तसे जाहीर करायला काही हरकत नव्हती. माझी ही चौथी भेट आहे. त्याचे उत्तर जे पहिले दिले तेच आज उत्तर आहे असं सांगत सामंत यांनी राज भेटीतील चर्चेवर फार भाष्य करणे टाळले.
त्याशिवाय आमच्या आजच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. या भागातून चाललो होतो, त्यामुळे राज ठाकरेंची भेट घेतली. राजकारणापलीकडचे काही संबंध असतात. उद्या संदीप देशपांडे मी चालता चालता भेटलो तर युतीची चर्चा होते असं नाही. काही भेटी अराजकीय असतात. आपणही या भेटींकडे राजकीय बघू नये. मी इथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला जाणार आहे. त्यामुळे मी राज ठाकरेंच्या भेटीतील निरोप घेऊन शिंदेंच्या भेटीला चाललो आहे अशा बातम्या लावाल. मात्र असं काही झाले नाही असा खोचक टोलाही उदय सामंत यांनी पत्रकारांना लगावला.
दरम्यान, राजकीय सोडून इतर विषयांवर चर्चा झाली. सगळ्या चर्चा सांगायच्या नसतात. ज्यावेळी खऱ्या अर्थाने राजकीय चर्चा करायच्या असतील तेव्हा अख्खी मोठी पत्रकार परिषद घेऊन मी आणि संदीप देशपांडे सांगू असंही मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं.
तेजस्वी घोसाळकर नाराजीवर सामंत यांची प्रतिक्रिया
अनेक उबाठाचे नेते, महिला आघाडीच्या नेत्या, युवासेनेचे नेते पक्ष सोडतायेत त्याचे आत्मचिंतन उबाठाने केले पाहिजे. जे आमच्या संपर्कात आहेत. जे इतर महायुतीतील पक्षात जातायेत. त्यांचे नेतृत्व स्वीकारतायेत. उबाठातून जास्तीत जास्त लोक आमच्याकडे येत आहेत. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व ते स्वीकारतायेत. शिंदे यांच्या कामाच्या पद्धतीने ते प्रभावित होतायेत असं विधान मंत्री उदय सामंत यांनी केले.