"बाळासाहेब ठाकरे कुणा एकट्याचे नाहीत..." संभाजीराजे छत्रपतींची वादात उडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 16:39 IST2022-06-28T16:39:21+5:302022-06-28T16:39:27+5:30
Maharashtra Political Crisis: 'बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरु नका, तुमच्या बापाचे नाव वापरुन मत मागा', असे आव्हान उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी बंडखोरांना केले होते.

"बाळासाहेब ठाकरे कुणा एकट्याचे नाहीत..." संभाजीराजे छत्रपतींची वादात उडी
बीड: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. एकीकडे बाळासाहेब ठाकरेंचे खरे शिवसैनिक म्हणत आहेत, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गट स्वतःला खरे शिवसैनिक म्हणत आहे. या नावावरुन पेटलेल्या नवीन वादात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी उडी घेतली आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराईमध्ये केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या उद्घाटनासाठी संभाजीराजे आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी या वादावर भाष्य केले. 'बाळासाहेब हे कुणा एकट्याचे नसून ते लोकनेते आहेत. त्यांचे नाव घेण्याचा सर्वांना अधिकार आहे', अशा शब्दात छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिले. 'कुणीही सरकार करावे, मात्र शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे ज्वलंत प्रश्न सोडवावेत', असंही संभाजीराजे म्हणाले.
संभाजीराजेंकडून शेतात पेरणी
संभाजीराजे यांनी आज बीडच्या तलवाडा येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये सोयाबीनची पेरणी केली. सरकार कोणाचे ही असो शेतकऱ्यांना मात्र पेरणीआधी मुबलक कर्ज मिळाले पाहिजे. अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी केली. यावेळी संभाजीराजेंनी बाजरीची भाकर खाल्ल्यामुळे शेतकऱ्यांनाही आनंदाचा पारावार राहिला नाही.