शिंदेंकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपालपदाची ऑफर; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 13:49 IST2025-01-28T13:48:16+5:302025-01-28T13:49:08+5:30

मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला आहे असंही माजी खासदाराने सांगितले.

Eknath Shinde group offers MP post, BJP offers Governor post; Thackeray group leader Chandrakant Khaire claims | शिंदेंकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपालपदाची ऑफर; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

शिंदेंकडून खासदारकीची तर भाजपाकडून राज्यपालपदाची ऑफर; ठाकरे गटाच्या नेत्याचा दावा

छत्रपती संभाजीनगर - शिवसेनेचे माजी नगरसेवक, पदाधिकारी यांना कोण आपल्याकडे खेचतं यासाठी  भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गट या दोघांमध्ये स्पर्धा सुरू आहे. आमचे बरेच शिवसैनिक आमिषाला बळी पडणार नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर महापालिका आम्ही आणणार म्हणजे आणणारच, मला अनेकदा ऑफर आली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वीही बडे नेते बोलले होते. मी शिवसेनाप्रमुख  बाळासाहेब ठाकरेंचा कडवट शिवसैनिक, माझ्या एकनिष्ठतेला मी तडा जाऊ देणार नाही असं सांगत माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी पक्षप्रवेशासाठी भाजपा-शिवसेनेकडून ऑफर आल्याचा गौप्यस्फोट केला.

चंद्रकांत खैरे म्हणाले की, मी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात काम करतोय, करत राहीन. जरी काही लोक माझ्याविरोधात काड्या करणारे तिथे पोहचले असले तरी मी काम करत असतो. माझा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास आहे आणि त्यांचाही माझ्यावर विश्वास आहे. मातोश्रीचा विश्वास माझ्यावर आहे. मी अनेक वर्षापासून एकनिष्ठ आहे. लोकसभा निवडणुकीआधी उमेदवार मिळत नव्हता तेव्हा शिंदे गटाकडून शिरसाट यांनी काही लोकांना पाठवले होते. आमच्याकडे त्यांना घेऊन या असं सांगितले. परंतु हे पाप मी कधी करणार नाही त्यांना सांगितले असं त्यांनी म्हटलं.

त्याशिवाय भाजपाचे लोक माझ्याकडे खूप वेळा येऊन गेलेत. माझा संपर्क अनेक वर्ष दिल्लीत होता. मला दिल्लीतून अनेक मान्यवरांशी ऑफर होती. तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला खासदार करतो, मंत्री करतो. अलीकडे मला हरिभाऊ बागडेंसारखं राज्यपाल करण्याचीही ऑफर देण्यात आली. पण मी जिथे आहे तिथे खुश आहे. मी राज्यपाल म्हणून का जाऊ, माझ्याकडे शिवसैनिक म्हणून सगळ्यात मोठे पद आहे. मला सर्वसामान्य कार्यकर्ता ते २० वर्ष खासदार, मंत्री होतो. मला खूप काही साहेबांनी दिले आहे. माझ्याकडे अनुभव जास्त आहे असं चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.

दरम्यान, मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला आहे. भलेही मला काही मिळालं नाही तरी चालेल. राजकारणात काहीही होऊ शकते. एकनाथ शिंदे आता हळूहळू बाजूला चाललेत.दोन्ही नेते आहेत. उद्धव ठाकरे खूप बुद्धिवान आहेत. हे सगळे फाटाफूट करून चाललेत. त्यांना स्वत:च्या थोबाडीत मारल्यासारखे होईल असं सांगत  उद्धव ठाकरे - देवेंद्र फडणवीस एकत्रित येऊ शकतात का यावर चंद्रकांत खैरे यांनी भाष्य केले आहे. 

Web Title: Eknath Shinde group offers MP post, BJP offers Governor post; Thackeray group leader Chandrakant Khaire claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.