Santosh Bangar: मंत्रालयातील पोलिसांना संतोष बांगर यांची शिवीगाळ? लेखी तक्रारीनंतर आमदारांचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 10:14 IST2022-11-04T10:13:32+5:302022-11-04T10:14:10+5:30
मला मुख्यमंत्री शिंदेंनी कोणतीही समज दिलेली नाहीय. आमदारांसोबत जे कार्यकर्ते असतात त्यांना आतमध्ये असेच जाऊ दिले जाते, असे बांगर म्हणाले.

Santosh Bangar: मंत्रालयातील पोलिसांना संतोष बांगर यांची शिवीगाळ? लेखी तक्रारीनंतर आमदारांचे स्पष्टीकरण
शिवसेनेचे शिंदे गटात गेलेले वादग्रस्त आमदार संतोष बांगर यांनी मंत्रालयाच्या गेटवर असलेल्या पोलिसांना शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. गुरुवारची ही घटना असून पोलिसाने वरिष्ठांकडे याची लेखी तक्रार केली आहे. यावर बांगर यांनी असे काही घडलेच नसल्याचे म्हटले आहे.
संतोष बांगर हे १०-१२ कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात जात होते. यावेळी पोलिसाने त्यांना हटकले आणि नोंद करून जाण्यास सांगितले. यावर बांगर यांनी या पोलीस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याची तक्रार या पोलीस कर्मचाऱ्याने केल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
यावर संतोष बांगर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिथे सीसीटीव्ही आहेत, काल मी आणि माझे कार्यकर्ते मंत्रालयात जात होतो. तेव्हा त्या पोलीस कर्मचाऱ्याने मला ओळखले नाही. तेव्हा माझ्या कार्यकर्त्याने त्यांना आमदार आहेत असे सांगितले. यानंतर त्या पोलिसाने जय महाराष्ट्र करत आम्हाला आत जाऊ दिले. जो पोलीस सकाळ ते संध्याकाळ तिथे ड्युटी करतो त्याच्याशी मी कोणताही वाद घातलेला नाही, असा खुलासा बांगर यांनी केला आहे.
मला मुख्यमंत्री शिंदेंनी कोणतीही समज दिलेली नाहीय. आमदारांसोबत जे कार्यकर्ते असतात त्यांना आतमध्ये असेच जाऊ दिले जाते. पासेस विचारले जात नाहीत, कारण आमदार सोबत असतात. पासेस विचारले असते तर वाद झाला असता ना, असेही उत्तर बांगर यांनी दिले.