कुजबुज! एकनाथ शिंदे आले अन् उद्धव ठाकरेंचे दर्शन घडले; एका क्षणात ती क्लिप बंद केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 06:21 IST2025-02-12T06:21:34+5:302025-02-12T06:21:56+5:30
ही चित्रफीत शिंदे यांनी उठाव करण्यापूर्वीची असल्याने त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दिसत होते.

कुजबुज! एकनाथ शिंदे आले अन् उद्धव ठाकरेंचे दर्शन घडले; एका क्षणात ती क्लिप बंद केली
चित्रफीत बघताच बदलले भाव
एमसीएचआयच्या मालमत्ता प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. त्यांची एंट्री झाली तेव्हा सभागृहात ‘जनांसाठी राब राबतो... अनाथांचा नाथ एकनाथ...’ या गाण्याची चित्रफीत दाखविली जात होती. ही चित्रफीत शिंदे यांनी उठाव करण्यापूर्वीची असल्याने त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दिसत होते. शिंदे सभागृहात आले तेव्हा स्क्रीनवर त्यांना उद्धव ठाकरे यांचे दर्शन घडले. जुने दृश्य पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. आणि एका क्षणात ती क्लिप बंद करण्यात आली.
डोंबिवलीकरांच्या अपेक्षा
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक हे मूळचे डोंबिवलीकर असल्याने त्यांनी पालिकेच्या परिवहन विभागाची दैनावस्था दूर करावी, अशी डोंबिवलीकरांची अपेक्षा आहे. सुसज्ज एसटी स्टँडला एक कोटींचे बक्षीस त्यांनी जाहीर केले. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिवहन व्यवस्था कोलमडल्या आहेत. डोंबिवलीत पश्चिमेची परिवहन सेवा बंद पडली आहे. नागरिकांना परिवहनसेवा हवी असून, ती मिळत नसल्याने सरनाईक यांच्याकडून अपेक्षा आहेत. परिवहन सेवा मिळाल्यास आर्थिक दिलासा मिळेल, सरनाईक तेवढं काम करतील अशी शिंदे सेनेमध्ये चर्चा आहे.
म्हाडात झाडाझडती आणि ‘सिंघम’
लोकशाही दिनात एकाच दिवसात पाच प्रकरणे मार्गी लावत म्हाडा मुख्यालयातील कार्यालयाची झाडाझडती घेणारे ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल चर्चेत आले आहेत. म्हाडा मुख्यालयाची झाडाझडती घेताना एक लाख फायलींचे वर्गीकरणाचे आदेश देताना जयस्वाल यांनी ‘सिंघम’ स्टाइलमध्ये कार्यालयाचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांचा लवाजमा घेऊन त्यांनी कार्यालयातील भंगार काढण्याचे आदेश दिले; हे सगळे करताना जयस्वाल यांच्या कामाची चर्चा रंगली होती. जयस्वाल यांचे वेगळे रूप पाहायला मिळाल्याने जयस्वाल ‘सिंघम’ आहेत का? अशी चर्चा म्हाडा कार्यालयात दोन दिवसांपासून रंगली होती.
प्रो गोविंदाचे आयोजन कुणाकडे?
दहीहंडी उत्सव मुंबईत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गोविंदा पथकांचा उत्साह आणि जिद्द पाहून राज्य सरकारने या उत्सवाला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा दिला आहे. त्यानुसार आता प्रो कबड्डीप्रमाणे गेल्या वर्षीपासून सरकारने प्रो गोविंदा ही स्पर्धा भरवण्यास सुरुवात केली. या स्पर्धेचे आयोजन क्रीडा विभाग करतो. मात्र, हा उत्सव सांस्कृतिक खात्याच्या अंतर्गत येत असल्याने स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत सांस्कृतिक विभाग आग्रही आहे. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन जाणार कुणाकडे? याबद्दल उत्सुकता आहे.