५ वेळा पक्षप्रमुखांना सांगितले, भाजपासोबत युती करा, पण...; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट
By प्रविण मरगळे | Updated: March 18, 2025 18:42 IST2025-03-18T18:41:45+5:302025-03-18T18:42:14+5:30
Eknath Shinde: अडीच वर्ष महायुती सरकार म्हणून काम केले. त्यामुळे निवडणुकीनंतर तुमचं विरोधी पक्षनेतेपदही गेले असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला.

५ वेळा पक्षप्रमुखांना सांगितले, भाजपासोबत युती करा, पण...; एकनाथ शिंदेंचा गौप्यस्फोट
मुंबई - सत्तेच्या खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार सोडले, औरंग्याचे विचार धरत खुर्ची मिळवली. त्यामुळे या लोकांना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नाही. बाळासाहेबांचे विचार सोडले, २०१९ मध्ये काँग्रेससोबत जाऊन सत्ता मिळवली. औरंगजेबाचे विचार स्वीकारले. अनिल परबांनी लोटांगण घातले. मला वाचवा असं म्हणाले आणि पुन्हा पलटी मारली. उद्धव ठाकरेही भाजपाकडे गेले आपण युती सरकार स्थापन करू असं म्हटले परंतु इथे आल्यावर पलटी मारली असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
औरंगजेबासारखा माझा छळ झाला असं विधान अनिल परब यांनी केले होते. त्या विधानावरून विधान परिषदेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंसह अनिल परबांवर जोरदार निशाणा साधला. यावेळी दोन्ही बाजूने गोंधळ सुरू होता. त्यातच शिंदे म्हणाले की, भाजपाचे देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर या चौघांना जेलमध्ये टाकणार होते. जेलमध्ये टाकून भाजपाचे आमदार फोडून त्यांना महाविकास आघाडीत घेणार होते. मी यांचा डाव मोडला, यांचा टांगा पलटी करून टाकला आणि महायुतीचं सरकार आणलं असं त्यांनी म्हटलं.
तसेच औरंगजेबाचे विचार तुम्ही स्वीकारले. सत्तेसाठी लाचार झाले. एकनाथ शिंदेने धाडस केले. शिवसेना वाचवली, धनुष्यबाण वाचवला म्हणून ८० पैकी ६० जागा आमच्या आल्या. तुम्ही १०० जागा लढवून फक्त २० आल्या. तुम्हाला जनतेने धडा शिकवला आहे. जनतेने तुमची जागा दाखवली आहे. लोकसभा निवडणुकीत रॅलीत पाकिस्तानी झेंडे नाचवले तुम्हाला लाज वाटली पाहिजे. मी धाडस केले आणि हिंदुत्वाचे सरकार आणले. बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आणले. अडीच वर्ष महायुती सरकार म्हणून काम केले. त्यामुळे निवडणुकीनंतर तुमचं विरोधी पक्षनेतेपदही गेले असा खोचक टोला एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला.
दरम्यान, उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना भेटले, मला माफ करा, आम्ही पुन्हा येतो असं सांगितले. त्यानंतर इथं आल्यानंतर पलटी मारली. अनिल परबही गेले होते. तुम्हाला नोटीस आली तेव्हा तुम्हीही गेलात, मला सोडवा असं म्हटले होते. आम्ही जे काही केले खुलेआम केले. लपून छपून गेलो नाही. शिवसेना, धनुष्यबाण धोक्यात आले तेव्हा आम्ही सरकार पलटी केले. तुमचा टांगा पलटी केला. हे करायला वाघाचे काळीज लागते. वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होऊ शकत नाही असा हल्लाबोल एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
"पक्षप्रमुखांना ५ वेळा सांगितले, भाजपाशी युती करा..."
अनिल परब तुमचा इतिहास मला माहिती आहे. मी कधीही कमरेखालचा वार करत नाही. कोण कुठे गेला कशाला गेला हे माहिती आहे. मी तुमच्या पक्षप्रमुखाला ५ वेळा सांगितले, शिवसेना-भाजपा युती करा. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा इतका मोह का झाला? आम्ही सत्तेवर लाथ मारली. मंत्रिपद सोडले. ८ मंत्र्यांनी पद सोडले, पुढे काय होणार हे माहिती नव्हते. आम्ही लढून जिंकू किंवा शहीद होऊ हेच आम्ही केले. मला आतलं सगळं माहिती आहे. कुणाची नोटीस थांबवायला काय काय केले मला माहिती आहे. मला डिवचू नका, माझ्या अस्तित्वाला चॅलेंज करू नका, मी जे केले जगाने पाहिले असं सांगत शिंदेंनी ठाकरे गटाला सूचक इशारा दिला.