जम्मू- काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पावले उचलली. याबाबत बोलताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेसने पाकिस्तानला योग्य उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही. काँग्रेस व्होट बँकेचे राजकारण करत होती, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
पहलगाम हल्ल्याच्या निषेर्धात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, 'पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानविरुद्ध सर्वात कठोर कारवाई केली. एक्शनवर रिएक्शन दिली. उच्चायुक्तालयातून ५ जणांना काढून टाकले. सिंधू जल करार स्थगित केला. अटारी सीमा बंद केली. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगितले. देशाचे रक्षण करणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांना पूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले, असे कधी घडले आहे का? पुलवामा हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक कोणी केले? यावेळीही पाकिस्तानला योग्य उत्तर मिळेल.'
काँग्रेसवर टीका करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, 'काँग्रेसने फक्त व्होट बँकचे राजकारण केले. त्यांनी कधीच पाकिस्तानला योग्य उत्तर देण्याची किंवा दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवली नाही. व्होट बँकेच्या राजकारणामुळे लाखो सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले. सकाळी तिन्ही सैन्याच्या पथकांमध्ये बैठक झाली आणि त्यात कठोर निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान मोदी पाकिस्तानचा पूर्णपणे नायनाट करून हिशोब चुकता करतील.'