Eknath Khadse: 'गिरीश महाजनांची गेस्टहाऊसवरील भानगड मी पाहिलीय'; एकनाथ खडसे मुलाच्या विषयावर भावूक झाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 23:57 IST2022-11-21T23:56:36+5:302022-11-21T23:57:12+5:30
Eknath Khadse on Girish Mahajan: एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत अनेक वर्षानंतर गिरीश महाजन यांनी या प्रकरणी आरोप केला आहे.

Eknath Khadse: 'गिरीश महाजनांची गेस्टहाऊसवरील भानगड मी पाहिलीय'; एकनाथ खडसे मुलाच्या विषयावर भावूक झाले
जळगाव : एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्या सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला याची चौकशी व्हायला पाहिजे, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यामुळे एकनाथ खडसे व त्यांचे कुटुंबीय भावनिक झाले असून या आरोपामुळे माझ्या परिवाराला अत्यंत वेदना झाल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.
अत्यंत नीच व हलकट प्रवृत्तीने गिरीश महाजनांनी अशा स्वरूपाचे प्रश्न उपस्थित केले असून माझ्या मुलाने आत्महत्या केली त्यावेळी मी इथे नव्हतो. मग गिरीश महाजन यांना रक्षावर संशय आहे का? असा सवाल उपस्थित केला. आमच्या परिवारावर संशय घेण्याचा प्रयत्न गिरीश महाजन यांनी केला असल्याचे खडसे यांनी म्हटले. गिरीश महाजन यांना सत्तेचा माज व सत्तेची मस्ती असून जनता मात्र ही मस्ती उतरल्याशिवाय राहणार नाही, अशी टीकाही एकनाथ खडसेंनी केली आहे.
एकनाथ खडसे यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत अनेक वर्षानंतर गिरीश महाजन यांनी या प्रकरणी आरोप केला आहे. मात्र या मागचे कारण गिरीश महाजन यांनाच माहिती असून त्यांनी फर्दापूरच्या गेस्टहाऊसवर काय भानगड झाली होती, त्यावेळी मी देखील त्या गेस्टहाऊसवर होतो. मी अनेक कृत्ये उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत. तेव्हा पेपरमध्ये चवीने छापून येत होते. मी त्यावर काही बोललो नाही. गिरीश महाजन यांचे अनेक महिलांशी प्रेम संबंध आहेत. मात्र याचा कधी उल्लेख मी केला नाही. एखाद्याचे प्रेमसंबंध असू शकतात, असा टोला खडसे यांनी लगावला.
नाहीतरी तुम्ही नाथाभाऊची चौकशी करून थकलात, त्यामुळे कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून माझ्या मुलाच्या मृत्यूची चौकशी करा, असा थेट इशारा एकनाथ खडसेंनी गिरीश महाजन यांना दिला आहे. मी त्यांना अडचणीचा ठरतो म्हणून अशा प्रकारे गिरीश महाजन उपद्व्याप करत असल्याचे एकनाथ खडसे म्हणाले.