आठवडाभरात शैक्षणिक आराखडा; शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे संस्थाचालकांना आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 07:23 IST2025-01-07T07:22:21+5:302025-01-07T07:23:28+5:30
पायाभूत सुविधांचा विकास करणार असल्याचीही दिली ग्वाही

आठवडाभरात शैक्षणिक आराखडा; शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे संस्थाचालकांना आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी शिक्षण देण्यात संस्थाचालकांची मोलाची भूमिका असून शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा. शिक्षण क्षेत्रात राज्याचा लौकिक निर्माण करण्यासाठी त्यांनी पुढे यावे. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी काही धोरणात्मक निर्णय बदलावे लागतील. येत्या आठवडाभरात शैक्षणिक आराखडा तयार केला जाईल, असे आश्वासन शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सोमवारी शैक्षणिक संस्थाचालकांना दिले.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे ‘गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण पद्धती’ विषयावर राज्यातील शिक्षण आणि शैक्षणिक संस्थांच्या संघटनांच्या प्रतिनिधींचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. आ. ज्ञानेश्वर म्हात्रे, शालेय शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांच्यासह सुमारे १२५ संस्थाचालक आणि मुख्याध्यापक या चर्चासत्राला उपस्थित होते.
मंत्री भुसे म्हणाले की, यापुढे कौशल्य व तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण देण्यावर भर द्यावा. शालेय शिक्षण विभागाचा कृतीवर अधिक भर असून चांगल्या कामास, उपक्रमास सरकार सहकार्य करेल.
अडचणी सोडवू
संस्थाचालक आणि संघटनेच्या प्रतिनिधींनी शिक्षक भरती, संच मान्यता, पवित्र पोर्टल, ११ वी प्रवेश प्रक्रिया, रोस्टर तपासणी, जुनी पेन्शन, सेवा ज्येष्ठता, अशैक्षणिक कामे आदी मांडलेल्या मुद्यांचा विचार केला जाईल. शाळा पातळीवरील अडचणी तीन महिन्यांत सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले.
पायाभूत सुविधांचा विकास करणार
शिक्षण क्षेत्रातील घटकांसोबत शिक्षणमंत्र्यांनी दोन महिन्यांतून एकदा अशी चर्चासत्रे घ्यावीत अशा सूचना संस्थाचालक, मुख्याध्यापकांनी केल्या. येत्या काळात शाळांमधील पायाभूत सुविधांचा विकास करण्याकडे लक्ष पुरवू असे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.