राज्य सहकारी बँक घोटाळा: शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 04:04 AM2019-09-25T04:04:07+5:302019-09-25T07:01:53+5:30

ऐन निवडणुकीत ईडीच्या कारवाईने उडाली खळबळ

ED Files Money Laundering Case against NCP chief Sharad Pawar Nephew Ajit Pawar in Maharashtra Bank Scam | राज्य सहकारी बँक घोटाळा: शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर गुन्हा

राज्य सहकारी बँक घोटाळा: शरद पवार, अजित पवारांसह ७० जणांवर गुन्हा

Next

मुंबई : राज्य मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या कथित कर्ज घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजप-शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांचा समावेश आहे. या प्रकरणी सविस्तर चौकशीनंतर पुढील कारवाई केली जाईल, असे ईडीतील सूत्रांकडून सांगण्यात आले. राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

राज्य मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अनियमित कर्जवाटप प्रकरणांत तब्बल २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप ‘नाबार्ड’च्या अहवालात आहे. ‘नाबार्ड’ने दिलेल्या अहवालाच्या आधारे समाजिक कार्यकर्ते सुरिंदर अरोरा यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर मुंबईत रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात २६ आॅगस्टला अजित
पवार यांच्यासह ७० नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मुंबईत गुन्हा दाखल झाल्यानंतर, या प्रकरणाच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (ईओडब्ल्यू) विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. त्यांच्याकडून तपास सुरू असतानाच ईडीने मंगळवारी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नेमका काय आहे आरोप?
राज्यातील सर्व जिल्हा सहकारी बॅँकेचे नेतृत्व करीत असलेल्या राज्य सहकारी बॅँकेत २००५ ते २०१० या काळात कर्ज वाटपात २५ हजार कोटींचा घोटाळा करण्यात आल्याचा ठपका ‘नाबार्ड’च्या अहवालात ठेवण्यात आला आहे. तारण न घेता सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्यांना बेकायदेशीर कर्ज वाटप, वसुलीमध्ये टाळाटाळ, दिवाळखोरीत निघालेले कारखाने, गिरण्यांच्या खरेदीमध्ये अनियमितता बाळगल्याचा ठपका तत्कालीन संचालक मंडळावर ठेवण्यात आला आहे.

शरद पवार कर्ज घोटाळ्याचे सूत्रधार?
मध्यवर्ती शिखर बॅँकेच्या संचालक मंडळात शरद पवार नसले तरी त्यांच्या नेतृत्वाखाली बॅँकेचा कारभार सुरू होता, असा आक्षेप याचिकाकर्त्याने घेतला आहे. त्यामुळे त्यांचा मुख्य सूत्रधारांमध्ये समावेश करण्यात आला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. आवश्यकतेनुसार याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांच्याविरुद्ध नोटीस बजावून चौकशीला बोलावण्यात येईल, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

या नेत्यांचा आहे समावेश
ईडीच्या तक्रारीमध्ये शरद पवार, अजित पवारांसह भाजपचे विजयसिंह मोहिते पाटील, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, मदन पाटील, आनंद अडसूळ, ईश्वरलाल जैन, दिलीपराव देशमुख, शेकापचे जयंत पाटील, हसन मुश्रीफ आदींची नावे आहेत.

माझ्या सभांना मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळेच कारवाई - शरद पवार
राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केल्याची मला माहिती नाही. असा काही गुन्हा दाखल करण्यात आला असेल, तर मी त्याचे स्वागतच करतो, पण मी कधीही कुठल्याही बँकेच्या संचालक पदावर नव्हतो. असे असताना केवळ माझ्या दौºयाला मिळणाºया प्रतिसादामुळेच ही कारवाई करण्याची वेळ आली असावी, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज्य सरकारला लगावला आहे.
माझ्या सभांना तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे माझ्यावर अशी कारवाई झाली नसती, तर आश्चर्य वाटले असते. माझ्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी अभिनंदन करतो, अशी उपरोधिक प्रतिक्रिया देतानाच माझा संबंध नसताना या घोटाळ्यात मला गोवण्यात आले आहे. हे महाराष्ट्र पाहत आहे, त्याचा उचित परिणाम काय होईल हे दिसेलच, असा इशाराही त्यांनी दिला.

Web Title: ED Files Money Laundering Case against NCP chief Sharad Pawar Nephew Ajit Pawar in Maharashtra Bank Scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.