आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख कमलाकर यांची उचलबांगडी
By Admin | Updated: June 10, 2016 05:08 IST2016-06-10T05:08:34+5:302016-06-10T05:08:34+5:30
धनंजय कमलाकर यांच्या मुलाचे कोट्यवधी रुपयांचे कथित भूखंड प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची तडकाफडकी बदली केली

आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख कमलाकर यांची उचलबांगडी
मुंबई : आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त आणि ज्येष्ठ आयपीएस अधिकारी धनंजय कमलाकर यांच्या मुलाचे कोट्यवधी रुपयांचे कथित भूखंड प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची तडकाफडकी बदली केली आहे.
कमलाकर यांना सागरी सुरक्षा विभागाचे महानिरिक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत या विभागात असलेले प्रवीण साळुंखे आर्थिक गुन्हे शाखेत कमलाकर यांच्या जागी आले आहेत.
कमलाकर यांचा मुलगा रोहित यांने पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसीतील २०५ कोटी रुपयांच्या ७६ हजार चौरस मीटर भूखंडावर चार जणांच्या मदतीने अतिक्रमण केल्याची तक्रार एमआयडीसीने पोलिसांत केलेली होती. बनावट नोंदी दाखविल्याचेही तक्रारीत म्हटले होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी देखील यास दुजोरा दिला. ते म्हणाले की, २० आॅक्टोबर १९९२ पासून ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची आहे. या जमिनीच्या खरेदी-विक्रीची कोणतीही परवानगी एमआयडीसीने दिलेली नाही. खरेदी झाल्यानंतर महसूल विभागाकडे तक्रार करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल.(विशेष प्रतिनिधी)