ई-चालान विरोध: राज्यव्यापी संप अखेर संध्याकाळी मागे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 07:49 IST2026-03-06T07:48:58+5:302026-03-06T07:49:22+5:30
मंत्री सरनाईक यांनी संध्याकाळी मध्यस्थी करीत हा संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. यावेळी म्हणाले, वाहतूकदारांच्या संपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली.

ई-चालान विरोध: राज्यव्यापी संप अखेर संध्याकाळी मागे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ई-चालान रद्द करण्याबाबत राज्यभरातील वाहतूकदारांनी पुकारलेला संप गुरुवारी संध्याकाळी मागे घेण्यात आला. समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेणार असून, लवकरच पोलिस व परिवहन विभागाची संयुक्त बैठक बोलावण्याचे आश्वासन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्यानंतर वाहतूकदारांनी हा निर्णय घेतला.
मंत्री सरनाईक यांनी संध्याकाळी मध्यस्थी करीत हा संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. यावेळी म्हणाले, वाहतूकदारांच्या संपाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूकदार संघटनांची शिखर समिती ‘महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट ॲक्शन कमिटी’च्या सदस्यांशी संवाद साधला. वाहतूकदारांच्या मागण्यांचा शासन विचार करीत असून, संप मागे घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.
... म्हणून आंदोलन तात्पुरते मागे, संघटनेचा दावा
ई-चलानांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल. तसेच या विषयावर चर्चा करण्यासाठी परिवहन विभाग, पोलिस प्रशासन आणि वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. दरम्यान, मंत्री सरनाईक यांनी आश्वासनांचा मान राखून ‘महाराष्ट्र ट्रान्सपोर्टर्स ॲक्शन कमिटी’सह विविध वाहतूक संघटनांनी सुरू असलेले आंदोलन तात्पुरते मागे घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले.