चांदीचा दर वाढला, उद्योग मात्र कोलमडला; उत्पादनांचा उठाव नाही
By विश्वास पाटील | Updated: December 27, 2025 17:37 IST2025-12-27T17:36:22+5:302025-12-27T17:37:06+5:30
चांदीची झळाळी उद्योगाच्या मुळावर उठू लागली

चांदीचा दर वाढला, उद्योग मात्र कोलमडला; उत्पादनांचा उठाव नाही
विश्वास पाटील
कोल्हापूर : आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या उलाढालीमुळे चांदीचे दर गगनाला भिडले, दराला झळाळी आली; परंतु तीच दराची झळाळी या उद्योगाच्या मुळावर उठू लागली आहे. दर वाढल्याने बाजारातचांदीच्या वस्तूंना मागणी नाही. त्यामुळे चांदी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
गेल्या डिसेंबरमध्ये चांदीचा सरासरी दर ७० हजार रुपये किलो होता, तो यावर्षी डिसेंबरमध्ये २ लाख ४१ हजारांवर गेला आहे. म्हणजे दरात तिप्पट वाढ झाली आहे. चांदी महागली तसे अलंकारही महागले. सर्वसामान्य माणूस पाच भार (५० ग्रॅम)चे पैंजण जास्त खरेदी करतो. त्याची किंमत ५ हजार होती ती आता १५ हजारांवर गेली आहे. प्रत्येक अलंकाराच्या दरात अशीच वाढ झाल्याने लग्नसराई सुरू होऊनही बाजारातून मालास उठाव नाही. त्यामुळे नवीन मागणी नाही. परिणामी काम ठप्प असल्याने कामगार इतर उद्योगांत रोजगार शोधू लागले आहेत. हुपरीच्या शंभर किलोमीटर परिघातील महिला घरबसल्या पैंजण गुंफून देण्याचे काम करतात.
कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीतील चांदी उद्योग हा महाराष्ट्रातील प्रमुख हस्तकला उद्योग आहे. हुपरीची बरोबरी सेलम, आग्रा, राजकोट येथील चांदी उद्योगाशी केली जाते. प्रत्येक शहराची एक वेगळी ओळख असते. तशी हुपरीची ओळखही मुख्यत: चांदीचे पैंजण करण्यासाठी जास्त प्रस्थापित झाली आहे. पैंजणासह, वाळे, करदोडे, जोडवी, वेडणी, तोडे आदी अलंकार येथे मुख्यत: केले जातात.
हे सगळे काम कलाकसुरीचे आहे. एक पैंजण करायला किमान २८ कारागिरांचे हात लागतात. हुपरीसह आजूबाजूच्या दहा-बारा गावांत सुमारे सहा हजारांवर चांदी उद्योजक आहेत. येथून काही टन माल तयार होऊन भारताच्या आणि जगाच्या बाजारपेठेत जातो. या परिसरात ४० हजार कामगार आहेत. दोन लाख लोकांचा चरितार्थ या उद्योगावर चालतो. त्यांना आता पुरेसे काम नाही.
मागच्या पाच वर्षांतील चांदीचा किलोचा दर
- २०२०-२१ : ६१९७९
- २०२१-२२ : ६८०९२
- २०२२-२३ : ७३३९५
- २०२३-२४ : ८६,०१७
- २०२४-२५ : २,१०,०००
हे देखील कारण महत्त्वाचेच
चांदी तांब्यापेक्षा जास्त भारवाहक आहे. त्यामुळे सोलरपासून, मोबाइल बॅटरी व अन्य तत्सम उद्योगांतही चांदीचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याने त्याचा दर वाढत असल्याचे कारण या उद्योगातील जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.
गेल्या वर्षभरात चांदीचे दर वाढले आहेत, दराला जरूर झळाळी आली; परंतु त्याचा फटका या उद्योगाला बसला आहे. दरवाढीमुळे चांदीच्या वस्तू खरेदीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात उठाव नाही. परिणामी कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. - मोहन खोत, अध्यक्ष, हुपरी चांदीमाल हस्तकला उद्योग विकास फाउंडेशन, हुपरी