ST संपाचा आणखी एक बळी; रेल्वेखाली झोकून देत कर्मचाऱ्याने संपवली जीवनयात्रा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 20:12 IST2022-03-28T18:52:01+5:302022-03-28T20:12:22+5:30
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे.

ST संपाचा आणखी एक बळी; रेल्वेखाली झोकून देत कर्मचाऱ्याने संपवली जीवनयात्रा
प्रशांत भदाणे
जळगाव - एसटीच्या संपामुळं अजून एका कर्मचाऱ्याने आपला जीव गमावला आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल आगारात चालक म्हणून सेवारत असलेल्या कर्मचाऱ्याने, सोमवारी दुपारी रेल्वेखाली झोकून देत आपली जीवनयात्रा संपवलीये. शिवाजी पंडित पाटील असं आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. एसटीच्या संपामुळं शिवाजी पाटील हे गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होते. त्यातच त्यांनी टोकाचा निर्णय घेत मृत्यूला कवटाळलं आहे.
शिवाजी पाटील तीन दिवसांपूर्वी जळगावात राहणाऱ्या त्यांच्या बहिणीकडे आले होते. मागील अनेक महिन्यांपासून एसटीचा संप सुरू आहे, आपल्याला पगार मिळत नाही, म्हणून आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचं त्यांनी बहिणीला सांगितलं होतं. अशातच सोमवारी त्यांनी रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली आहे. पोलिसांनी ती ताब्यात घेतली आहे.
शिवाजी पाटील हे मूळचे यावल शहरातील रहिवासी होते, आधीच त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यातच सहा महिन्यांपासून एसटीचा संप सुरू असल्यानं पगार बंद होता. त्यामुळं ते अधिकच संकटात सापडले होते. स्वतःची शेती नाही, हक्काचं घर नाही, अशी त्यांची स्थिती होती. पगार नसल्यानं सहा महिन्यांपासून ते घरभाडंही भरू शकले नव्हते. शेवटी त्यांनी आत्महत्या केली. सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढला नाही, म्हणूनच ही वेळ आल्याचा आरोप शिवाजी पाटलांच्या नातेवाईकांनी केला आहे. एसटीच्या संपाचा तिढा सुटत नसल्यानं कर्मचाऱ्यांचा धीर सुटत चालला आहे. त्यामुळं अशा दुर्दैवी घटना घडताहेत. शिवाजी पाटलांच्या मृत्यूनंतर तरी सरकारला एसटी कर्मचाऱ्यांचं दुःख समजणार आहे का? हा खरा प्रश्न आहे.
ST कर्मचाऱ्यांनो ३१ मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावं
संपकरी एस.टी. कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत. ३१ मार्च, २०२२ पर्यंत एसटीच्या संपकरी(ST Workers Agitation) कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी अधिवेशनात दोन्ही सभागृहात केले होते. तसेच कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्याबाबत चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली होती.