'अदानीमुळे LIC व SBI मधील कोट्यवधी गुंतवणुकदारांचे कष्टाचे पैसे धोक्यात', काँग्रेसचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 16:01 IST2023-01-28T16:01:26+5:302023-01-28T16:01:59+5:30
Gautam Adani: अदानी समूहातील गैरव्यवहार ही सामान्य घटना नसून उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ठ संबंध पाहता सेबी व रिझर्व्ह बँकेने या हेराफेरीची गंभीरपणे चौकशी केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. या

'अदानीमुळे LIC व SBI मधील कोट्यवधी गुंतवणुकदारांचे कष्टाचे पैसे धोक्यात', काँग्रेसचा गंभीर आरोप
मुंबई - अदानी समुहातील आर्थिक गैरव्यवहार हिंडनबर्ग संशोधन संस्थेने उघड केल्याने या समुहातील मोठ्या गुंतवणुकीचा फुगवलेला फुगा फुटला आहे. अदानी समुहातील हेराफेरी उघड झाल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया व एलआयसीमध्ये गरिब, मध्यमवर्गीय व कष्टकरी लोकांनी केलेली गुंतवणूक धोक्यात आली आहे. अदानी समूहातील गैरव्यवहार ही सामान्य घटना नसून उद्योगपती गौतम अदानी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे घनिष्ठ संबंध पाहता सेबी व रिझर्व्ह बँकेने या हेराफेरीची गंभीरपणे चौकशी केली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.
यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी अदानी समुहाला खाजगी बँकांपेक्षा दुप्पट कर्ज दिले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एकट्या स्टेट बँक ऑफ इंडियाने अदानी कंपनीला ४०% कर्ज दिले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दुसरी मोठी कंपनी एलआयसी ने ८ टक्के शेअर्स म्हणजेच तब्बल ७४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केली आहे. अदानी समुहात मोदी सरकारने केलेल्या या अंधाधुंद व बेजबाबदार गुंतवणुकीमुळे LIC आणि SBI मध्ये बचत केलेल्या करोडो सामान्य गुंतवणुकदारांसमोर गंभीर आर्थिक धोका निर्माण झाला आहे.
अदानी समुहावर आर्थिक गैरव्यवहाराचे अतिशय गंभीर आरोप आहेत. क्षमतेपेक्षा अधिक कर्ज अदानी समुहावर असल्याचा ठपकाही हिंडेबनर्गच्या अहवालात ठेवलेला आहे. पंतप्रधान मोदी यांचे लाडके उद्योगपती असलेल्या अदानींच्या विविध कंपन्यात मोदी सरकारने एलआयसी, एसबीआय आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या संस्थांद्वारे अविचाराने गुंतवणुक करुन आर्थिक व्यवस्थेचे प्रचंड नुकसान केले आहे. सामान्य गुंतवणुकदारांचे हित लक्षात घेता या आर्थिक घोटाळ्याचा गंभीर तपास होणे गरजेचे आहे, असेही लोंढे म्हणाले.