जेसीबीचा धक्का लागल्याने गॅसवाहिनीतून वायूगळती
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 14:23 IST2017-10-09T14:23:14+5:302017-10-09T14:23:45+5:30
खोदाईचे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅस निगम लिमिटेड(एमएनजीएल) ची गॅसवाहिनी फुटल्याने कात्रज दूध डेअरी चौकात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली.

जेसीबीचा धक्का लागल्याने गॅसवाहिनीतून वायूगळती
पुणे - खोदाईचे काम सुरू असताना जेसीबीचा धक्का लागून महानगर गॅस निगम लिमिटेड(एमएनजीएल) ची गॅसवाहिनी फुटल्याने कात्रज दूध डेअरी चौकात दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वायुगळती झाली. अग्निशमन दलाचे पथक त्वरीत घटनास्थळी पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.
सोमवारी दुपारी कात्रज येथील दूध डेअरी चौकात महापालिकेच्या वतीने खोदाईचे काम सुरू होते. या ठिकाणी असलेल्या गॅसवाहिनीबाबत जेसबीचालकाला माहित नव्हते. त्यामुळे खोदकाम करताना जेसीबीचा धक्का लागून गॅसवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वायूगळती होऊ लागली. परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला याबाबत कळविले. संजय रामटेके यांच्यासह पथकाने याठिकाणी धाव घेतली. याबाबत एमएनजीएल कंपनीच्या अधिकाºयांनाही कळविण्यात आले. या ठिकाणापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर गॅसवाहिनीचा व्हॉल्व होता. एमएनजीएलच्या कर्मचाºयांनी तातडीने हा व्हॉल्व बंद केला. त्यामुळे गॅस गळती थांबली. त्यानंतर एमएनजीएलकडून गॅसवाहिनीची दुरुस्ती सुरु करण्यात आली आहे.
खोदाई करताना वाहिन्यांकडे लक्ष नाही
पुणे शहरात खोदाई करताना गॅसवाहिन्या, जलवाहिन्यांसोबत विद्युतवाहिन्यांचे नुकसान होण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्याच आठवड्यात आंबिल ओढा परिसरात खोदाईचे काम सुरू असताना १३२ केव्ही वीजवाहिनी तुटली होती. त्यामुळे अर्ध्या शहराचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. दोन दिवस शहरातील बहुतांश भाग अंधारात होता. जलवाहिन्या फुटून पाणीगळती होण्याचे प्रमाणही सातत्याने वाढत आहे. महापालिका, महावितरण, एमएनजीएल, टेलीफोन आदी कामांसाठी खोदाई करताना भूमिगत वाहिन्यांबाबत कोणतीही काळजी घेतली जात नाही. महापालिकेकडूनही याबाबत कोणत्याही प्रकारचे नियोजन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरात मोठा धोका होण्याची भीती आहे.