लोकमत न्यूज नेटवर्कमीरा-भाईंदर : नगरसेवक, आमदार, खासदार आपलेच निवडून आणायचे. अमराठी मतदारसंघ बनवून हा सगळा भूभाग गुजरातला मिळवायचा हा यांचा डाव आहे. हिंदुत्वाच्या बुरख्याआडून मराठी संपवण्याचे राजकारण सुरू आहे. तुम्ही खडकासारखे टणक राहा. प्रत्येकाशी मराठीतच बोला, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मीरा-भाईंदरमधील जाहीर सभा गाजवली.
अटकेपार झेंडे फडकवणारा महाराष्ट्र आज हतबल झाला आहे. हिंदी सक्तीची करणार अशी भाषा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतात. तसा प्रयत्न तर करून बघा, दुकानेच नाही, शाळाही बंद करू अशा शब्दात राज ठाकरे यांनी सरकारला इशारा दिला. माझे सगळ्या भाषेवर प्रेम आहे. राज्यातल्या कोणत्याही नेत्यापेक्षा माझी हिंदी जास्त चांगली आहे. भाषा कोणतीही वाईट नसते. मात्र, ती जर तुम्ही लादणार असाल तर आम्ही बोलणार नाही, जा... काय करायचे ते करा..!
भाषेची सक्ती करत त्याअडून तुम्हाला चाचपडून बघायचे. तुम्ही चिडत नाही, पेटून उठत नाही, हे लक्षात आले की इथे सगळे मतदारसंघ अमराठी करून ताब्यात घ्यायचे आणि मुंबई गुजरातला मिळवायची, हे त्यांचे स्वप्न आहे, असे सांगून राज म्हणाले, तुम्ही स्वतःहून काही करू नका; पण कोणी माज दाखवला तर ठेचून काढायला मागेपुढे बघू नका.
तुम्ही स्वतःहून काही करू नका; पण कोणी माज दाखवला तर ठेचून काढायला मागेपुढे बघू नका. भाजपचे खासदार दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे. समुद्रात बुडवून बुडवून मारू. हा आमच्या बापाचा महाराष्ट्र आहे. जर का मराठी माणसाच्या वाटेला जाल, तर तुमचा गाल आणि आमचा हात याची युती झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.
देशातल्या २५० भाषा हिंदीने मारल्यादोनशे वर्षांचाही इतिहास नसलेल्या हिंदीने देशातल्या कमीत कमी २५० भाषा मारून टाकल्या. त्यातल्या अनेक भाषा उत्तरेकडच्या आहेत. देशात कोणाचीही मातृभाषा हिंदी नाही. जी हनुमानचालिसा तुम्ही म्हणता तीदेखील हिंदी नाही. ती अवधी भाषेत आहे. ज्या हिंदीने अनेक जुन्या दुर्मीळ भाषा संपवल्या तीच हिंदी आता मराठी संपवणार असेल तर ते आपण होऊ द्यायचे का? असा सवाल ही राज ठाकरे यांनी केला.