नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 

By मनीषा म्हात्रे | Updated: June 17, 2025 06:10 IST2025-06-17T06:08:40+5:302025-06-17T06:10:01+5:30

भूषण गगराणी यांची माहिती, चौकशी समितीच्या अहवालात अनेक प्रश्नांची उत्तरे नाहीत 

Drain cleaning corruption: Three engineers charged, contractor Purohit blacklisted | नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 

नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 

मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई: नालेसफाईत भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदार भूपेंद्र पुरोहितच्या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच ठेकेदारासह महापालिकेच्या तीन अभियंत्यांवर कामात कसूर केल्याचा ठपका ठेवल्याची माहिती महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी ‘लोकमत’ला दिली. नालेसफाईमध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार केला जात आहे याचे ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यानंतर महापालिकेने दक्षता विभागाचे प्रमुख अभियंता अविनाश तांबेवाघ यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमले होते. पंधरा दिवसांत त्यांनी अहवाल द्यावा, असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार त्यांनी अहवाल दिला असून, त्यात तीन अभियंत्यांवर ठपका ठेवल्याचे गगराणी यांनी सांगितले. त्या तीन अभियंत्यांची विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. शिवाय आणखी काही अभिप्राय मागवण्यात आले असून, ते येताच पुढील कारवाई केली जाईल. ठेकेदार भूपेंद्र पुरोहितवर नियमानुसार काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.

चौकशी समिती खालील प्रश्नांची उत्तरे देईल का?
१४ ज्युनियर इंजिनिअर, वजन काटा तसेच डम्पिंगच्या जागेवरील अधिकाऱ्यांचे मोबाइल ठेकेदारांचा माणूस ऑपरेट करत असल्याचे स्टिंग ऑपरेशनदरम्यान उघडकीस आल्यानंतर फक्त तीन अधिकाऱ्यांवरच ठपका कसा?
अन्य अधिकाऱ्यांचे काय झाले?
सर्वांचे लोकेशन आणि मोबाइल लोकेशनची तपासणी करण्यात आली का?
त्या तपासणीतून काय निष्पन्न झाले? एम ईस्टसह अन्य वॉर्डांचीही वाहनेही तिथे येत होती. याबाबतचे सर्व पुरावे असताना चौकशी समितीने त्यावर स्वतःचे मत दिले आहे का?
लॉगशीटवरील सह्या तसेच अधिकाऱ्यांचे मोबाइल लोकेशन चौकशी करताना तपासले का?
मुंबईतील एस वॉर्डच नाही तर अन्य वॉर्डचेही अधिकारी, ठेकेदारांची वाहने गाळ म्हणून बांधकाम साईटवरील माल उचलताना दिसून आले. त्यांची चौकशी झाली का?
नालेसफाई नेमकी किती झाली? याची पडताळणी झाली का?
मिठी नदीप्रमाणे नालेसफाईतही बनावट लॉगशीटचा वापर करण्यात आला आहे. 
मिठी प्रमाणे नालेसफाईतील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार का?

नेमके प्रकरण काय?
नालेसफाईच्या नावाखाली प्रत्यक्षात बांधकाम साईटवरील ‘काळा माल’ हा गाळ म्हणून दाखवून लॉगशीट तयार केले जात असल्याचे ‘स्टिंग ऑपरेशन’मधून समोर आले होते. पालिका अधिकाऱ्यांचे युजर आयडी आणि पासवर्ड असलेले मोबाइल ठेकेदारांचा माणूस ऑपरेट करताना दिसला. तसेच, लॉगशीटवर एकाच वेळी अधिकाऱ्यांनी सह्या केल्याचे दिसून आले होते. 

दक्षता विभागाचे प्रमुख अभियंता कोणाला पाठीशी घालत आहेत?
‘लोकमत’ने या प्रकरणाचे सविस्तर स्टिंग ऑपरेशन केले होते. याबद्दलची सगळी माहिती वर्तमानपत्रातून छापून आली. याचे ऑडिओ आणि व्हिडीओ तसेच अन्य माहिती उपलब्ध असताना चौकशी समितीने निवडक अधिकाऱ्यांवर कारवाई केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. 

Web Title: Drain cleaning corruption: Three engineers charged, contractor Purohit blacklisted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.