डॉ. मनमोहन सिंगांवर आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरद पवार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 21:59 IST2017-12-12T21:57:20+5:302017-12-12T21:59:42+5:30
यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका केली. वैयक्तिक टीकाटिप्पणी करणाऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा सामील होते.

डॉ. मनमोहन सिंगांवर आरोप करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शरद पवार यांची टीका
नागपूर - यंदाच्या गुजरात विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका केली. वैयक्तिक टीकाटिप्पणी करणाऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा सामील होते. मोदींनी गुजरात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पाकिस्तानच्या मुद्द्यावरून माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर आरोपांची राळ उडवली होती. मोदींच्या या आरोपबाजीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शरद पवार आज हल्लाबोल मोर्चात सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करतानाच मनमोहन सिंग यांच्यावर वैयक्तिक टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही खडेबोल सुनावले."मनमोहन सिंग यांच्यासारख्या प्रामाणिक आणि देशभक्त नेत्याचा पाकिस्तानशी संबंध जोडताना भाजपाला लाज वाटली पाहिजे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. त्यांच्या मनात असले वाईट विचार कसे काय येऊ शकतात, असा सवाल शरद पवार यांनी केला. गुजरातमधील निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेस पाकिस्तानची मदत घेत आहे. त्यासाठी पाकिस्तानच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे सुद्धा उपस्थित होते, असा सनसनाटी आरोप मोदींनी केला.
तब्बल 37 वर्षांनंतर शरद पवार आपल्या वाढदिवसा दिवशी एखाद्या मोर्चात सहभागी झाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या या हल्लाबोल मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर जनसहभाग दिसून आला होता. या मोर्चानंतर आयोजित सभेसाठी गुलाम नबी आझाद, शरद पवार यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते. हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी नागपुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी आयोजित केलेल्या हल्लाबोल मोर्चाला संबोधित करताना माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी सरकारच्या धोरणांवर घणाघाती टीका केली. झोपलेल्या सरकारला जागं करण्याठी आज हा हल्लाबोल मोर्चा काढावा लागल्याचे त्यांनी सांगितले. तसेच बिनकामाच्या सरकारला धडा शिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात असहकार पुकारावा, वीज बिल, कर भरू नयेत असे आवाहन त्यांनी केले.