कोकण कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. संजय सावंत यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 19:23 IST2019-03-07T19:19:40+5:302019-03-07T19:23:03+5:30

राज्यपालांकडून संजय सावंत यांची नियुक्ती

dr Sanjay Sawant appointed as Vice Chancellor of Konkan Agricultural University | कोकण कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. संजय सावंत यांची नियुक्ती

कोकण कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. संजय सावंत यांची नियुक्ती

पुणे येथील भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राचे संचालक डॉ संजय दिनानाथ सावंत यांची दापोलीयेथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी गुरुवारी (०७ मार्च) डॉ. सावंत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. डॉ सावंत यांची नियुक्ती पाच वर्षासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करतील, यापैकी जो दिनांक अगोदर असेल, तोपर्यत करण्यात आली आहे.  

डॉ. तपस भट्टाचार्य यांनी दिनांक 31 ऑगस्ट 2018 रोजी विद्यापीठाच्या  कुलगुरुपदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. पी. विश्वनाथ यांच्याकडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. डॉ संजय सावंत यांनी राहूरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातून एम. एससी (कृषि) ही पदवी प्राप्त केल्यानंतर पंतनगर येथील गोविंद बल्लभ पंत कृषि विश्वविद्यालयातून पीएच. डी. प्राप्त केली. त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे.

डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या निवडीसाठी राज्यपालांनी मुंबई उच्च न्यायालयातील सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश न्या. (डॉ.) मंजुला चेल्लूर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. भारतीय कृषिसंशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन मोहापात्रा  आणिकृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले हे समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्यानतर राज्यपालांनी डॉ. सावंत यांच्या नियुक्तीची घोषणा केली.
 

Web Title: dr Sanjay Sawant appointed as Vice Chancellor of Konkan Agricultural University

टॅग्स :agricultureशेती