चिंता नसावी! राज्यातील धरणे ७० टक्के भरलेली, गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के जास्त साठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 07:39 IST2025-02-10T07:39:12+5:302025-02-10T07:39:26+5:30
कोकणातील ११ धरणात ६४ टक्के साठा आहे. नागपूर विभागातील १६ धरणांमध्ये ६० टक्के जलसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत तो ६१ टक्के होता.

चिंता नसावी! राज्यातील धरणे ७० टक्के भरलेली, गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के जास्त साठा
बाळासाहेब बोचरे
मुंबई: फेब्रुवारीतच उन्हाचे चटके बसू लागले तरी यंदा पाण्याची चिंता भासेल अशी चिन्हे नाहीत. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने राज्यातील बहुतांश धरणांमध्ये ७० टक्केच्यावर साठा असून गतवर्षीच्या तुलनेत हा साठी २० टक्के जास्त आहे.
राज्यात १३८ मोठी धरणे आहेत. त्यामध्ये सरासरी ६९.४० टक्के जलसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के जास्त जलसाठा आहे. सर्वाधिक ७६ टक्के जलसाठा नाशिक विभागातील २२ धरणांमध्ये आहे. त्याखालोखाल संभाजीनगर विभागातील ४४ धरणांमध्ये ७३.२० टक्के साठा आहे. अमरावती विभागातील १० धरणात ६९ टक्के तर पुणे विभागातील ३५ धरणात ७० टक्के साठा आहे. कोकणातील ११ धरणात ६४ टक्के साठा आहे. नागपूर विभागातील १६ धरणांमध्ये ६० टक्के जलसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत तो ६१ टक्के होता.
२६० मध्यम प्रकल्प ६५ टक्के भरलेले
राज्यात २६० मध्यम प्रकल्पात सरासरी ६५% जलसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत तो ११% अधिक आहे. कोकणातील ८ प्रकल्पात ८३%, अमरावतीतील ३५ प्रकल्पात ७२%, पुणे विभागातील ५० प्रकल्पात ६६%, नाशिक विभागातील ५४ प्रकल्पात ६३%, छत्रपती संभाजीनगर विभागातील ८१ प्रकल्पात ५७ % जलसाठा आहे.
२५९९ लघू प्रकल्पात ४९ टक्के जलसाठा
राज्यातील २५९९ लघू प्रकल्पात ४८.७४ टक्के जलसाठा असून गतवर्षीच्या तुलनेत तो ७ टक्के अधिक आहे. यामध्ये कोकण विभागात सर्वाधिक ७० टक्के तर अमरावती विभागात ६० टक्के साठा आहे. संभाजीनगर आणि नाशिक विभागात ४० टक्के तर पुणे विभागात ४८ टक्के जलसाठा आहे.