‘दलित’ शब्द वापरास मनाई; शासनाकडून आदेश जारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2019 20:46 IST2019-09-18T20:43:57+5:302019-09-18T20:46:46+5:30

अमरावती येथील पंकज मेश्राम यांच्या लढ्याला यश

dont use dalit word state govt orders all departments | ‘दलित’ शब्द वापरास मनाई; शासनाकडून आदेश जारी 

‘दलित’ शब्द वापरास मनाई; शासनाकडून आदेश जारी 

अमरावती : अनुसूचित जातीच्या संबोधनासाठी सर्व सरकारी व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्रे आदींमध्ये आता ‘दलित’ शब्द वापरता येणार नाही. त्याऐवजी पर्यायी शब्दप्रयोग करावा, असे आदेश राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने आज दिले. 

अमरावती येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज मेश्राम यांनी ‘दलित’ शब्दप्रयोग हद्दपार व्हावा, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका क्रमांक ११४/२०१६ दाखल केली होती. या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयाने ‘दलित’ शब्दाऐवजी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद ३४१ नुसार निर्गमित केलेल्या राष्ट्रपतींच्या आदेशानुसार नमूद अनुसूचित जातीच्या संबोधनाकरिता सर्व व्यवहार, प्रकरणे, प्रमाणपत्र आदी कागदपत्रांमध्ये इंग्रजी भाषेत ‘शेड्यूल्ड कास्ट’ व अन्य राष्ट्रीय भाषांमध्ये नामाभिधानाच्या योग्य अनुवादित शब्दप्रयोग करावा, अशा सूचना उच्च न्यायालयाने दिल्या आहेत. त्याअनुषंगाने शासनाने ‘दलित’ शब्दाऐवजी इंग्रजीत ‘शेड्यूल्ड कास्ट, न्यू बौद्ध’ तर मराठी भाषेत ‘अनुसूचित जाती अथवा नवबौद्ध’ अशा संबोधनाचा वापर करावा, असे सहसचिव दिनेश डिंगळे यांनी शासनादेशाद्वारे स्पष्ट केले आहे. 

अखेर शासनाने ‘दलित’ शब्द वापरास मनाई केली आहे. हा शब्दप्रयोग करू नये, असे संविधानात नमूद आहे. ही बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. आता न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. उशिरा का होईना, पण न्याय मिळाल्याचे समाधान आहे.
- पंकज मेश्राम, याचिकाकर्ता, अमरावती
 

Web Title: dont use dalit word state govt orders all departments