CM Devendra Fadnavis: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला महिना उलटून गेल्यानंतरही या प्रकरणातील संशियत वाल्मीक कराड याच्यावर खुनाचा गुन्हा नोंदवलेला नाही. तसंच हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असला तरी या हत्येशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाईही करण्यात आली नाही. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून कराडला वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आज पाण्याच्या टाकीवर चढत आंदोलन केलं. या आंदोलनानंतर आता सरकार दरबारी हालचाली वाढल्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी प्रमुखांसह सीआयडी पथकाच्या प्रमुखांना फोन करून आरोपींवर कठोर कारवाई सूचना दिल्याचे समजते.
"सरपंच हत्या प्रकरणातील एकही आरोपी सुटता कामा नये. कोणावरही दयामाया दाखवू नका. आरोपींवर कठोर कारवाई करा," अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोनवर दिल्याची माहिती आहे. तसंच या प्रकरणातील तपासाचाही मुख्यमंत्र्यांकडून आढावा घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या सूचनांनंतर आता वाल्मीक कराडभोवतीचा कारवाईचा फास आवळला जाणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वैभवी देशमुखचा संताप; काय म्हणाली सरपंचांची मुलगी?
"आजवर आम्ही खूप शांततेत आंदोलन केले पण काहीच हाती लागत नाही. काय तपास सुरू आहे, याची माहिती आम्हाला देण्यात येत नाही, काकाला काय झाले तर कोण जबाबदार? घरातील एक माणूस गेले तर प्रशासन काही करत नाहीत. वडील गेले; आम्ही सर्व गेलो तर यांचे डोळे उघडणार आहेत का?" असा उद्विग्न सवाल सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने उपस्थित केला आहे.