लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका, हॉटेल चालकांच्या बैठीकत मुख्यमंत्र्यांनी दिला अखेरचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 08:24 PM2021-03-13T20:24:22+5:302021-03-13T20:26:35+5:30

संसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहांनी नियमांचे काटेकोर पालन करावे : मुख्यमंत्री

Dont force us to take decision of lockdown in maharashtra the last warning given by the Chief Minister uddhav thackeray at the meeting of hotel operators | लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका, हॉटेल चालकांच्या बैठीकत मुख्यमंत्र्यांनी दिला अखेरचा इशारा

लॉकडाऊन करण्यास भाग पाडू नका, हॉटेल चालकांच्या बैठीकत मुख्यमंत्र्यांनी दिला अखेरचा इशारा

Next
ठळक मुद्देसंसर्ग रोखण्यासाठी हॉटेल्स, उपाहारगृहांनी नियमांचे काटेकोर पालन करावे : मुख्यमंत्रीमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली हॉटेल्स, मॉलच्या प्रतिनिधींची बैठक

"गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून आपण सर्व व्यवहार सुरु केले आणि त्यानंतर सुमारे ४ महिने आपण सर्वांनी एकजुटीने संसर्ग रोखला. पण आता मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी आणि नियम न पाळल्याने संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. अजूनही परिस्थिती नियंत्रणात असून हॉटेल व उपाहारगृहांनी नियमांचे पालन करावे, कडक लॉकडाऊन करण्यास भाग पडू नये, हा शेवटचा इशारा आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी आहार, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन, शॉपिंग सेन्टर्स असोसिएशन यांच्या प्रतिनिधींशी दुरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन संवाद साधला व सहकार्याचे आवाहन केले. 

"गेल्या ४ महिन्यात सर्व व्यवस्थित होत होते. आपल्याच राज्यात नव्हे तर अगदी युरोपमध्ये सुद्धा जणू काही कोरोना गेल्यासारखं सर्व व्यवहार मोकळेपणाने सुरु झाले होते. मात्र अचानक सर्वत्रच संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून तिकडे ब्राझीलमध्ये भयानक स्थिती झाली आहे. आपल्याला युरोपसारखी परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर काटेकोरपणे आरोग्याचे नियम पाळावे लागतील," असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

स्वयंशिस्त महत्वाची  

पुढच्या काळात देखील आपल्याला कोविडबरोबरच जगायचे असून जीवनपद्धती त्याला अनुरूप करावी लागेल. बंदी आणि स्वयंशिस्त यात फरक असून सर्वांनी याचे भान ठेवावे लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. "मागील वर्षी विशेषत्वाने झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणावर संसर्ग दिसू लागला होता. यावेळी मात्र तो इमारती, बंगले, सोसायट्यांमध्ये दिसतो आहे. याचे कारण म्हणजे समाजातील या वर्गाचे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना भेटणे, हॉटेलिंग, मॉल्समध्ये जाणे सुरु झाले आहे. त्यामुळे परिवारांतल्या सर्व सदस्यांत एकदम फैलाव होत आहे, असेही ते म्हणाले.  



केंद्रीय पथक मुंबईत

मागील आठवड्यात केंद्रीय पथक मुंबईत आले असता एका हॉटेलमध्ये त्यांना कोणत्याही कर्मचाऱ्यांनी मास्क न घातलेला व सुरक्षित अंतर न पाळता गर्दी झाल्याचा अनुभव त्यांनी आपणास सांगितला होता. हॉटेल्स आणि उपाहारगृहे हे भेटीगाठी व जेवण-नाश्त्याचे प्रमुख ठिकाण असून सुरुवातीच्या काळात नियमांचे पालन होताना दिसत होते. हॉटेल्समध्ये समोरासमोर न बसवता सुरक्षित अंतर ठेऊन बसविणे, वेटर्सआणि इतर कर्मचारी यांनी मास्क घालणे, जंतुनाशक फवारणी असे होत होते. पण राज्यभरात आता काही हॉटेल्स , मॉल्स, उपाहारगृहांत नियमांची पायमल्ली होऊन वातावरण सैल झाल्यासारखे प्रशासनाला दिसत आहे. अजूनही परिस्थिती आपल्या हातात आहे, आपण स्वत:हून आमच्या एसओपीचे पालन नीट व काटेकोरपणे झालेच पाहिजे हे पहा. सर्वजण नियम धुडकावत आहेत असे नाही. पण काही नियम न पाळणाऱ्यांमुळे धोका वाढतोय असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. "लॉकडाऊन लावून सगळे बंद करणे आम्हाला सुद्धा आवडत नाही. आपण हे अर्थचक्र सुरु केले आहे. सर्वांनी सहकार्य केले तर संसर्ग रोखता येईल त्यामुळे लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध लावण्यास भाग पडू नका," असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

नियम तोडत असतील तर कारवाई करा      

पालिका आणि पोलीस प्रशासनाने देखील यासंदर्भात राज्यातील सर्व हॉटेल्स व उपाहारगृहे काटेकोर पालन करतात किंवा नाही तसेच नियम तोडत असतील तर कारवाई करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. "हॉटेल्स संघटनांनी प्रत्येक प्रभागात त्यांची फिरती पथके तयार करून नियमांचे पालन होते आहे किंवा नाही ते तपासावे. सर्व पदाधिकाऱ्यांची तत्काळ बैठक घेऊन त्यांना जाणीव करून द्यावी. एक स्टार किंवा दोन स्टार तसेच लहान उपाहारगृहांत नियम पाळत नसल्याचे दिसून येते," असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल म्हणाले.

Web Title: Dont force us to take decision of lockdown in maharashtra the last warning given by the Chief Minister uddhav thackeray at the meeting of hotel operators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.