Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 06:53 IST2025-11-20T06:52:02+5:302025-11-20T06:53:20+5:30
Dombivli Politics: डोंबिवलीत मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने जाळे टाकल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: शिंदेसेनेतून भाजपमध्ये घरवापसी झालेले माजी नगरसेवक महेश पाटील, डॉ. सुनीता पाटील, सायली विचारे, संजय विचारे यांच्यामुळे पाथर्ली, गोग्रासवाडी येथील शिंदेसेनेचे हमखास विजयाची खात्री असलेले पॅनल संपुष्टात आल्याने तेथे आता भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे त्या परिसरातील मनसेचे नेते व माजी नगरसेवक मनोज घरत, मंदा पाटील यांच्यासाठी शिंदेसेनेने जाळे फेकल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
या दोघांपैकी एका नगरसेवकाच्या निकटच्या नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, आ. राजेश मोरे यांच्याकडून त्यांच्याशी बुधवारी थेट संपर्क साधण्यात आला असून, शिंदेसेनेत येण्याबाबत विचारणा करण्यात आली. भाजपकडूनही या दोघांना विचारणा झाली आहे. आता त्यांच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, अद्याप त्या दोन्ही माजी नगरसेवकांचा काहीही निर्णय झाला नसल्याने सत्ताधारी पक्षांची ‘वेट अँड वॉच’ भूमिका आहे.
डोंबिवली पश्चिमेतही भाजप, शिंदेसेना सक्रिय
डोंबिवली पश्चिमेला मनसेचे प्रकाश भोईर, सरोज भोईर हे माजी नगरसेवक असून, ते वास्तव्यास असणाऱ्या उमेशनगर भागात भाजप, शिंदेसेनेने राजकीय समीकरणे जुळवण्याकरिता प्रयत्न सुरू केले आहेत. भोईर दाम्पत्य काय निर्णय घेते, याकडे दोन्ही पक्षांचे लक्ष लागले आहे. भोईर दाम्पत्याकरिता दोन्ही पक्षांनी रेड कार्पेट टाकले आहे. मात्र, भोईर हेदेखील राजू पाटील यांना डावलून निर्णय घेतील का, याबाबत उलटसुलट मते व्यक्त होत आहेत.
मनोज घरत, मंदा पाटील हे राजू पाटील यांचे विश्वासू
मनोज घरत, मंदा पाटील हे मनसे नेते राजू पाटील यांचे निकटवर्तीय आहेत. पाटील यांच्या कन्येच्या लग्नाला राजू पाटील हे कुटुंबीयांसमवेत दोन्ही दिवस पूर्णवेळ उपस्थित होते. मंदा या त्यांच्या कुटुंबातील असल्याने पाटील यांना डावलून ते कोणताही निर्णय घेणार नाहीत. तीच स्थिती घरत यांचीही असून ते पाटील यांचे विश्वासू आहेत.
पाटील-चव्हाण हे तर सख्खे शेजारी मित्र
राजू पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे सख्खे शेजारी व मित्र आहेत. पाटील यांना आमदारकीच्या काळात चव्हाण यांनी विकासकामांसाठी १५० कोटींचा निधी दिला होता. त्यामुळे चव्हाण हे पाटील यांचे उरलेसुरले साथीदार फोडतील का, अशी शंका घेतली जाते. पण, मनसेतून नेते शिंदेसेनेत जाणे भाजपला परवडणारे नसल्याने शिंदेसेनेची कोंडी करण्याकरिता भाजप मनसेच्या काही नेत्यांना प्रवेश देईल, असा होरा आहे.