सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का? धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 15:58 IST2018-03-26T15:58:15+5:302018-03-26T15:58:15+5:30
भीमाकोरेगाव प्रकरणाच्या दंगलीमधील आरोपी एकबोटे स्वत:हून अटक झाला. मात्र दुसरा आरोपी संभाजी भिडे याला अटक करण्यात आली नाही याचा अर्थ सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला.

सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का? धनंजय मुंडेंचा सरकारला सवाल
मुंबई : भीमाकोरेगाव प्रकरणाच्या दंगलीमधील आरोपी एकबोटे स्वत:हून अटक झाला. मात्र दुसरा आरोपी संभाजी भिडे याला अटक करण्यात आली नाही याचा अर्थ सरकारला दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायची आहे का असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला केला.
संभाजी भिडेला अटक होत नाही तोपर्यंत असे मोर्चे निघणार आहेत. संभाजी भिडे याला अटक का होत नाही असा सवाल करतानाच धनंजय मुंडे यांनी सभागृहातील सर्व विषय बाजुला ठेवून भिडे यांच्या अटकेबाबत चर्चा व्हावी अशी मागणी केली. आज विधानपरिषदेमध्ये संभाजी भिडे याला अटक का करण्यात आली नाही याविषयावर जोरदार चर्चा झाली. यावेळी सभागृहामध्ये आमदार भाई जगताप, आमदार कपिल पाटील, आमदार जोगेंद्र कवाडे यांनीही संभाजी भिडे याच्या अटकेची मागणी केली.
दरम्यान रत्नागिरीच्या खेड येथेही रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाची विटंबना झाली आहे. एकीकडे भीमा कोरेगाव प्रकरण ताजे असताना अशापध्दतीने बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाची विटंबना सुरु आहे. या सरकारमध्ये महापुरुषांच्या पुतळयांची विंटबना सुरु असून समाजकंटकांना सरकारची भीती राहिलेली नाही असा आरोपही धनंजय मुंडे यांनी केला. रत्नागिरी - खेड प्रकरणातही सरकारने निवेदन करावे अशी मागणीही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.