आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? त्यांची पोटदुखी त्यांनी सांभाळावी: उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 11:42 IST2025-07-21T11:42:04+5:302025-07-21T11:42:22+5:30

आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असे उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

Does anyone have any problem with us two brothers coming together? They should take care of their stomach aches: Uddhav Thackeray | आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? त्यांची पोटदुखी त्यांनी सांभाळावी: उद्धव ठाकरे

आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? त्यांची पोटदुखी त्यांनी सांभाळावी: उद्धव ठाकरे

मुंबई : ‘‘आम्ही दोघे भाऊ एकत्र आल्याने कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? त्यांची पोटदुखी त्यांनी सांभाळाव्यात. आम्ही दोघे मिळून महाराष्ट्राचे स्वप्न साकार करू. योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ, असे उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या मुखपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही भूमिका मांडली. 
आमच्या एकत्र येण्यामुळे केवळ मराठी माणसांनाच नाही, तर इतर भाषिकांनासुद्धा आनंद झाला. अगदी मुसलमान बांधवांनादेखील आनंद झाला. ते जाहीरपणाने आनंद व्यक्त करताहेत. गुजराती आणि हिंदी इतर भाषिकसुद्धा म्हणाले, ‘अच्छा किया आपने’. त्यांना झालेला हा आनंद मी बघतो. पण कोणाला पोटशूळ झालाच असेल तर तो पोटशूळ त्याच्याकडे. त्याकडे मी दुर्लक्ष करतो. आता मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी कोणाची माय व्यायली आहे बघूच, असा इशारा त्यांनी दिला.

मंत्र्यांच्या भानगडी मोडीत काढा; मुख्यमंत्र्यांना सल्ला   
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकाऱ्यांच्या आणि मंत्र्यांच्या भानगडी, लफडी बाहेर येत आहेत, ते मुख्यमंत्र्यांनी मोडीत काढायला हवे. हे मी त्यांना आमचे कधी काळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतो. त्यांनी हे माझे मत टोमणा म्हणून नाही, तर सल्ला म्हणून घ्यावे, असेही ठाकरे म्हणाले.  हे आधीच स्पष्ट करतो. ते नीती वगैरे सगळ्या गोष्टी पाळत असतील, तर हे जे काही आजूबाजूला चाललेले आहे, ते त्यांच्या प्रतिमेला तडा देण्याचे काम आहे. कुठे ३ हजार कोटींची चोरी सर्वोच्च न्यायालय पकडून देत आहे. हे सगळे जे काही चालले आहे, याचे प्रमुख म्हणून बदनाम फडणवीस होत आहेत, असे ठाकरे एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. 

‘कदाचित शिंदे-ठाकरेही मिठी मारतील’ 
राज ठाकरेंनी शिवसेना सोडल्यानंतर हे दोघे एकमेकांकडे बघत नव्हते, बोलत नव्हते. ५ जुलैला आलिंगन घातले. कदाचित हाच प्रसंग भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातही  होऊ शकतो, असे शिंदेसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले. 

‘...तेव्हाच ठाकरे ब्रँड संपलेला आहे’ 
बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हाची गोष्ट वेगळी होती. मात्र, काही जण जेव्हा काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, तेव्हाच ठाकरे ब्रँड संपलेला आहे. प्रश्न यांचेच, उत्तरे यांचीच ही कसली मुलाखत? अशी टीका जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली.

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये; शिंदेंनी दिला इशारा

काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांवर दगड मारू नये, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेला दिला. उद्धवसेनेच्या नेत्यांनी शिंदेसेनेचे रामदास कदम आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर अधिवेशनात आरोप केले होते. याचा एकनाथ शिंदे यांनी रविवारी समाचार घेतला. गोरेगावमधील नेस्को येथे ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत सिद्धेश कदम यांनी आयोजित केलेल्या विशेष शिबिरात ते बोलत होते. 

त्यांच्या पोटात दुखते!
शिंदे म्हणाले, निवडणुका आल्या की काही लोक बदनामीची खेळी खेळतात. त्यांच्या पोटात दुखते कारण त्यांनी इतकी वर्षे मराठी माणसांसाठी काही केले नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते की ४० लाख घरे मराठी माणसाला मिळायला हवीत. आम्ही हे स्वप्न पुढे नेत आहोत. ३५ लाख घरे उभारण्याचे काम सुरू केले आहे. मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही; पण प्रत्येकाच्या हातात तो देण्याची माझी इच्छा आहे, असेही शिंदे म्हणाले.

Web Title: Does anyone have any problem with us two brothers coming together? They should take care of their stomach aches: Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.