डॉक्टरांना विसरलात का?
By Admin | Updated: October 8, 2014 21:48 IST2014-10-08T21:15:07+5:302014-10-08T21:48:05+5:30
वषार्नंतरही मारेकरी सापडत नाहीत, हे सगळ्याच पक्षांनी नजरेआड केले आहे.

डॉक्टरांना विसरलात का?
राजीव मुळ्ये - सातारा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाचा, अयशस्वी तपासाचा आणि जादूटोणाविरोधी कायद्याचा निवडणूककाळात सर्वच पक्षांना विसर पडला आहे का, असा उद्विग्न सवाल दाभोलकर कुटुंबीयांनी केला आहे. चांगले काम म्हणून सत्ताधारी जादूटोणाविरोधी कायद्याचा उल्लेख जाहिरातीत करीत नाहीत आणि विरोधक कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा म्हणूनसुद्धा हा प्रश्न उचलत नाहीत, याबद्दल कुटुंबीयांनी सखेद आश्चर्य व्यक्त केले आहे.
‘राजकीय पक्षांचे प्रचाराचे मुद्दे पाहिले असता, ते गंभीरपणे का घ्यावेत, असा प्रश्न मतदारांना पडतो,’ असे निरीक्षण एक नागरिक म्हणून नोंदवून मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, ‘राज्याची प्रगती हा सर्वच पक्षांचा प्रचाराचा मुद्दा आहे. विवेकी विचार करणारी निर्भय माणसे घडविल्याशिवाय प्रगती साधता येत नाही. अशी माणसे घडविणाऱ्या डॉक्टरांची हत्या हा प्रगतीच्या मार्गावर आघात आहे, असे कुणालाच वाटू नये, याचा खेद होतो.’ सत्ताधारी आणि विरोधक या दोहोंना हा विषय कसा गैरसोयीचा आहे, हे दाखवून देताना त्या म्हणाल्या, ‘सत्ताधाऱ्यांनी जादूटोणाविरोधी कायद्याचा मुद्दा मांडला, तर तो डॉक्टरांच्या हत्येनंतर विलंबाने केला, हे स्वीकारावे लागेल. शिवाय हल्लेखोरांचा तपास लावण्यात आलेले अपयशही स्वीकारावे लागेल. विरोधकांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून त्या-त्यावेळी टीका केली; परंतु आता तसे केल्यास कायद्याला विरोध का केला, याचा जाब विचारला जाईल. या कायद्याच्या कचाट्यात सर्वधर्मीय भोंदू सापडले असल्याने कायदा धर्मविरोधी असल्याचा प्रचार चुकीचा होता, हेही त्यांना मान्य करावे लागेल. म्हणून तेही गप्प आहेत. एकंदर सर्वांचीच अडचण आहे.’
डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ‘तपासाच्या बाबतीत झालेल्या हलगर्जीपणाबद्दल, स्थानिक पातळीवरही कोणत्याच पक्षाचे नेते आता बोलत नाहीत. राज्याला दिशादिग्दर्शन करणाऱ्या एका कार्यकर्त्याचा खून होतो, वषार्नंतरही मारेकरी सापडत नाहीत, हे सगळ्याच पक्षांनी नजरेआड केले आहे.
राज्य आणि स्थानिक पातळीवरील नेते डॉक्टरांच्या हत्येचा विषय टाळत आहेत. प्लँचेट प्रकरणाच्या अहवालाचे पुढे काय झाले, असेही कोणी विचारत नाही. डॉक्टरांच्या नावाने पुरस्कार दिले की जबाबदारी संपते का? मारेकरी का सापडले नाहीत, हे कोण विचारणार?
- डॉ. हमीद दाभोलकर
फुले, आंबेडकर, शाहू, शिवाजी महाराज, प्रबोधनकार ठाकरे, सावरकर यांची नावे सर्वपक्षीय नेते घेत आहेत. राज्याच्या अस्मिता याच नावांभोवती फिरतात. तथापि, विवेकी विचार हे या सर्व महापुरुषांचे वैशिष्ट्य होते, हे सगळेच विसरले आहेत.
- मुक्ता दाभोलकर
सक्रिय राजकारणाचा सल्ला नाकारला
सत्ताधारी आणि विरोधक यांपैकी कोणीही डॉ. दाभोलकरांची हत्या आणि जादूटोणाविरोधी कायद्याचा विषय चर्चेत आणणार नाहीत, याची खात्री असलेल्या हितचिंतकांनी प्रमुख नेत्यांविरोधात थेट निवडणूक लढविण्याचा सल्ला दाभोलकर कुटुंबीयांना दिला होता. जय-पराजय नव्हे, तर केवळ डॉक्टरांच्या हत्येच्या विषयावर चर्चा घडवून आणणे हाच उद्देश त्यामागे होता; तथापि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम हे निवडणुकीच्या पलीकडचे व्यापक राजकारणच असून, निवडणुकीच्या राजकारणात पडायचे नाही, असा निर्णय आपण घेतल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.