३१ आॅक्टोबरपर्यंत पाणी सोडू नका; ‘पाटबंधारे’चा आदेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 04:51 IST2018-10-30T04:50:18+5:302018-10-30T04:51:11+5:30
मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यास औरंगाबाद पाटबंधारे महामंडळानेच अचानक स्थगिती दिली.

३१ आॅक्टोबरपर्यंत पाणी सोडू नका; ‘पाटबंधारे’चा आदेश
अहमदनगर/औरंगाबाद : मुळा व भंडारदरा धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यास औरंगाबाद पाटबंधारे महामंडळानेच अचानक स्थगिती दिली. नगर जिल्ह्यातील दोन्ही धरणांतून येत्या ३१ आॅक्टोबरपर्यंत पाणी सोडू नका, असा महामंडाचा आदेश सोमवारी दुपारी पाटबंधारे विभागाला प्राप्त झाला़ त्यामुळे पाणी सोडण्याची प्रक्रिया थांबविली आहे.
जायकवाडीला मुळा व भंडारदरा धरणातून पाणी सोडण्याची तयारी झाली होती़ सोमवारी १२ वाजता पाणी सोडणार होते़ तत्पूर्वी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सोमवारी पूर्वतयारीचा आढावा घेतला़ जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्माही बैठकीला हजर होते़ या वेळी अकोले तालुक्यातील शेतकरी अगस्ती सेतूवर ठाण मांडून असल्याचे सांगण्यात आले़ पाणी सोडल्यास अनुचित प्रकार घडू नये, यासाठी धुळे व नंदुरबार येथून राज्य राखीव पोलीस दलाची कुमक बोलविण्यात आली़ हे पथक नगरकडे निघाले होते़ पाटबंधारे विभागाचे अधिकारीही मुळा व निळवंडे धरणावर दाखल झाले होते़ आदेश येताच पाणी सोडणार होते़ त्यापूर्वी दुपारी अडीच वाजता औरंगाबाद पाटबंधारे महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिकर यांचे तूर्त पाणी न सोडण्याचे आदेश कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांना मिळाले.
सर्वोच्च न्यायालयात ३१ आॅक्टोबरला सुनावणी
प्रवरा व उर्ध्व गोदावरी धरण समूहातून मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोेडण्याच्या निर्णयाविरुद्ध डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी व संजीवनी सह. साखर कारखान्यांनी सर्वोच्च दाखल केलेल्या केलेल्या याचिकांवर आता
३१ आॅक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.