“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 19:19 IST2025-12-08T19:18:14+5:302025-12-08T19:19:54+5:30
नागपूर शहरातील एसटीच्या गणेशपेठ बसस्थानकाला अचानक भेट

“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
ST Minister Pratap Sarnaik News: हिवाळी अधिवेशन आपल्या शहरांमध्ये आहे त्यामुळे मंत्री कधीही भेट देऊ शकतात. त्यासाठी केवळ देखावा म्हणून प्रवासी सुविधा निर्माण करू नका, तर वर्षातील ३६५ दिवस प्रवाशांना त्यांच्या मूलभूत सुविधा मिळणे हे आपल्या कर्तव्य आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करा. असे निर्देश परिवहन मंत्री तथा एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज स्थगित झाल्यानंतर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नागपूरातील गणेशपेठ बसस्थानकाला अचानक भेट दिली. यावेळी मंत्री सरनाईक यांनी प्रसाधनगृह, उपहारगृह, चौकशी कक्ष, प्रवासी प्रतीक्षालय, चालक-वाहक विश्श्रांतीगृह यांसह सर्व महत्वाच्या विभागांची तपासणी केली. चालक व वाहकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गरम पाण्याची उपलब्धता आणि इतर सुविधा सुधारल्याबद्दल चालक-वाहकांनी मंत्री महोदयांचे आभार मानले.
महिला कर्मचारी नियुक्त करा
बसची प्रतिक्षा करत असलेल्या NCC कॅडेट विद्यार्थी आणि प्रवाशांशी चर्चा करून त्यांच्या सूचनांचा आढावा घेण्यात आला. महिला प्रवाशांसाठी विशेषतः स्तनदा मातांसाठी असलेल्या हिरकणी कक्षाची तपासणीही करण्यात आली. केवळ औपचारिकता पूर्ण करण्यासाठी हिरकणी कक्ष निर्माण करु नका ते अद्यायावत करून तिथे महिला कर्मचारी नियुक्त करा. असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी दिले. तपासणीदरम्यान काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या. शौचालयांची स्वच्छता समाधानकारक असल्याचे आढळले. इतर एसटी स्थानकांच्या तुलनेत नागपूर बस स्थानकात सुमारे ९० टक्के सुविधा चांगल्या अवस्थेत आहेत. मात्र, कॅटिनमध्ये अत्यंत अस्वच्छता व दुर्गंधी आढळून आली. यावर तत्काळ कारवाईचे आदेश देत कँटिनचा परवाना रद्द करण्यासाठी महानगरपालिकेलाही सूचना करण्यात आल्या.
सोलापूरचा धसका
सोलापूर आणि धाराशिव येथील अचानक भेटीमुळे एसटी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. याची प्रचिती गणेशपेठ बसस्थानकावरील सुधारणा बघितल्यावर जाणवले, अशी मिश्किल प्रतिक्रिया मंत्री सरनाईक यांनी दिली. राज्यातील एसटी बसस्थानकावरील सुविधांमध्ये सकारात्मक बदल दिसत असून, हे बदल केवळ देखावा न राहता वर्षातील ३६५ दिवस प्रवाशांना त्यांच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. अशा सुचना मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिल्या.
दरम्यान, विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या विद्यार्थी हेल्पलाइनच्या माध्यमातून अनेक तक्रारींचे जलद निरसन होत आहे. परंतु तक्रारी होणार नाहीत अशी यंत्रणा कार्यान्वित करण्यावर भर देण्यात येणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटीच्या सेवांमध्ये स्वच्छता, सुविधा आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी पुढील काळातही कडक भूमिका कायम राहील, असे सांगितले.