राहुल नार्वेकरांची नार्कोटेस्ट करा; निकालाआधीच ठाकरे गटाच्या आमदाराची खळबळजनक मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 13:23 IST2024-01-10T13:22:23+5:302024-01-10T13:23:36+5:30
उद्धव ठाकरेंसारखा चांगला, प्रामाणिक नेता महाराष्ट्राला लाभला. त्यांच्यासोबत आम्ही काम करतोय हे आमचे भाग्य आहे असं आमदार नितीन देशमुख यांनी म्हटलं.

राहुल नार्वेकरांची नार्कोटेस्ट करा; निकालाआधीच ठाकरे गटाच्या आमदाराची खळबळजनक मागणी
अकोला - राज्यातील ठाकरे-शिंदे यांच्यातील सत्तासंघर्षाच्या नाट्यातील आजचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. शिंदे गटाच्या १६ आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्षांकडून निकाल सुनावला जाणार आहे. तत्पूर्वी ठाकरे गटाकडून निकालाआधीच विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. त्यात ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट करा अशी खळबळजनक मागणी केली आहे.
आमदार नितीन देशमुख म्हणाले की, जो चुकीचे काम करतो त्याला झोप लागत नाही. शिंदे गटातील ज्या आमदारांनी चुकीचे काम केले त्यांना निश्चित झोप लागत नसेल. निकाल काय यापेक्षा येणाऱ्या निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्यावर आमचा भर आहे. निकालावर जास्त लक्ष केंद्रीत करत नाही. जर राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट केली तर सर्व षडयंत्र बाहेर येईल. एक न्यायाधीश आरोपीच्या घरी भेटायला जातात त्यावरून सगळे चित्र दिसत आहे. त्यामुळे राहुल नार्वेकरांची नार्को टेस्ट केली तर विधानसभा अध्यक्षपदी बसलेला माणूस कसा आहे हे देशाला दिसेल असं त्यांनी म्हटलं आहे.
त्याचसोबत उद्धव ठाकरेंसारखा चांगला, प्रामाणिक नेता महाराष्ट्राला लाभला. त्यांच्यासोबत आम्ही काम करतोय हे आमचे भाग्य आहे. निकाल विरोधात गेला तर पुढची आखणी उद्धव ठाकरेंनी केली आहे. निकालाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतील. जे काही वरिष्ठ नेते ठरवतील. निकाल जो काही लागेल त्याची शिंदे गटाला पूर्वकल्पना असेलच. त्यांच्याशी चर्चा करूनच विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार आहेत त्यामुळेच राहुल नार्वेकरांची नार्कोटेस्ट होणे गरजेचे आहे असं नितीन देशमुखांनी सांगितले.
दरम्यान, हे सगळं षडयंत्र सुरुवातीपासून रचले गेले आहे. सत्तांतरानंतर अध्यक्षांची निवड केली पाहिजे. कोण अध्यक्ष असला पाहिजे. मग पुढे कसे निकाल दिले पाहिजे. कशा घटना घडवल्या पाहिजे. हे षडयंत्र आत्ताचे नाही तर गेल्या अडीच तीन वर्षापासून आखलेले षडयंत्र आहे. आमच्या डोक्यावर बाळासाहेबांचा हात आहे. जनता जर्नादन येणाऱ्या काळात बाळासाहेबांच्या मागे, उद्धव ठाकरेंच्या पाठिशी राहील असं आमदार नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे.