यदु जोशीमुंबई - मे मध्ये राज्य सरकारच्या तालुका आणि जिल्हा समित्यांवरील नियुक्ती, तसेच एसईओंची नियुक्ती करण्याचा आणि राज्य पातळीवरील समित्या व महामंडळांवरील नियुक्ती जूनमध्ये करण्याचा शब्द आता भाजपजनांना देण्यात आल्याने कार्यकर्ते, नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
भाजपचे आमदार, राज्य पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष निवडीसाठीचे निरीक्षक यांची तीन दिवसांपूर्वी मुंबईत बैठक झाली. विदर्भाची एक ऑनलाइन बैठक शुक्रवारी झाली. या बैठकांमध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नियुक्त्यांचे सुतोवाच केले. विशेष कार्यकारी दंडाधिकारी (एसईओ), तालुका स्तरावरील २७ समित्या आणि जिल्हा पातळीवरील ३२ समित्यांवरील सदस्य, अध्यक्षांची भाजपच्या कोट्यातील नावे ही पक्षाच्या जिल्हा कोअर कमिटीकडून प्रदेशाध्यक्षांकडे पाठविली जातील. १ ते ३१ मे दरम्यान सर्व नियुक्त्या करण्याचा प्रयत्न असेल. राज्य पातळीवरील समित्या, महामंडळांवरील नियुक्ती या १ जून ते ३० जूनदरम्यान करण्यात येतील. सूत्रांनी सांगितले की, महायुतीमध्ये ज्या जिल्ह्यात तीनपैकी एकच पक्षाचा मोठा प्रभाव आहे तिथे त्या पक्षाला जवळपास ६५ ते ७० टक्के पदे दिली जातील.
कोणत्या पक्षाला कोणती महामंडळे?महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रत्येक दोन नेत्यांची मिळून समन्वय समिती आहे. पुढच्या महिन्यात या समितीच्या बैठका होतील. कोणत्या पक्षाला कोणती महामंडळे द्यायची यावर चर्चा केली जाईल. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्रितपणे निर्णय घेतील, असेही सूत्रांनी सांगितले.
जिल्हाध्यक्षांची निवड ३ मेच्या आत होणार
राज्यातील भाजपच्या संघटनात्मकदृष्ट्या असलेल्या ७८ जिल्ह्यांच्या अध्यक्षांची निवड ३ मे पूर्वी करण्यात येईल. जिल्हाध्यक्षपदासाठी जे निरीक्षक नेमण्यात आले ते पक्षातील २१ प्रकारच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रत्येकाकडून तीन नावे घेतील. त्यातून सर्वाधिक पसंती मिळेल त्याला जिल्हाध्यक्षपद दिले जाईल. दोन टर्म पक्षाचा सक्रिय सदस्य राहिलेली असेल अशाच व्यक्तीचा जिल्हाध्यक्षपदासाठी विचार केला जाईल. जिल्ह्यातून तीन नावे जिल्हाध्यक्षपदासाठी पाठविली जातील त्या व्यक्ती शिस्तप्रिय असाव्यात ही मुख्य अट आहे.