मुंबई : चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सोमवारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. कार्यक्रमात राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांची भाषणे झाली, मात्र कार्यक्रमपत्रिका बदलल्याने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना भाषणाची संधी मिळाली नाही. यावरून नाराजीनाट्य सुरू असल्याची चर्चा आहे.
कार्यक्रम संपल्यानंतर राज्यपाल व्यासपीठावरून जाण्याआधीच अजित पवार तडकाफडकी निघून गेले. शिंदे यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेत नाराजी नसल्याचे स्पष्ट केले.
या कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भाषणासाठी पाच-पाच मिनिटांचा वेळ देण्यात आला होता, असे समजते. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे आणि त्यानंतर राज्यपालांचे भाषण होऊन कार्यक्रम संपला. कार्यक्रम पत्रिका कोणी बदलली, याची विचारणा शिंदे यांनी अधिकाऱ्यांकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले.
याबाबत महायुतीत खूप आलबेल आहे, खूप समन्वयाने चालले आहे, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.