शिक्षकांच्या बदल्यांमध्ये गडबड, कार्यमुक्ती थांबली; महसूल अप्पर आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 07:00 IST2025-09-22T07:00:19+5:302025-09-22T07:00:46+5:30

शिक्षक संघटना उपोषणावर ठाम, शासनाच्या नियमानुसार जिल्ह्यातील जि. प. शाळांमध्ये कार्यरत असलेल्या ३५९४ शिक्षकांच्या बदल्या केल्या. या शिक्षकांना अद्यापपर्यंत कार्यमुक्तीचे आदेश दिलेले नाहीत

Disruption in teacher transfers, release stopped; Revenue Additional Commissioner orders inquiry | शिक्षकांच्या बदल्यांमध्ये गडबड, कार्यमुक्ती थांबली; महसूल अप्पर आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

शिक्षकांच्या बदल्यांमध्ये गडबड, कार्यमुक्ती थांबली; महसूल अप्पर आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांच्या झालेल्या बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप शिक्षक समितीने करीत २२ सप्टेंबरपासून विभागीय आयुक्तालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विभागीय अप्पर आयुक्त राजेंद्र अहिरे यांनी शिक्षकांच्या बदल्यामध्ये झालेल्या अनियमिततेची नियमानुसार चौकशी करून अहवाल कार्यालयास सादर करण्याच्या सूचना सीईओंना दिल्या आहेत. या आदेशानंतरही शिक्षक समितीने उपोषण करण्यावर ठाम असल्याचे कळविले आहे.

शासनाच्या नियमानुसार जिल्ह्यातील जि. प. शाळांमध्ये कार्यरत असलेल्या ३५९४ शिक्षकांच्या बदल्या केल्या. या शिक्षकांना अद्यापपर्यंत कार्यमुक्तीचे आदेश दिलेले नाहीत. बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप आहे. शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस रणजित राठोड यांनी सर्व संवर्गांमध्ये जवळपास ३०० बदल्यांमध्ये अनियमितता असल्याचा दावा केला. 

हे आहेत शिक्षक संघटनांचे आक्षेप
संवर्ग १ चा लाभ घेऊन ज्यांनी शाळा बदलली, त्यातील स्वतः दिव्यांग, आजारी शिक्षक ज्यांचे पाल्य किंवा आई-वडील दिव्यांग किंवा आजारी त्याची तपासणी जिल्हा शल्यचिकित्सकांकडून केलेली नाही. त्यांनी ज्या जोडीदारामुळे संवर्ग २ चा लाभ घेतला, त्यांचे सध्याचे कार्यालयाचे अंतर बदलीपूर्वी व बदलीनंतर शासन निर्णयाप्रमाणे आहे का, याची तपासणी झालेली नाही. संवर्ग ३ मध्ये ज्यांनी बदली करून घेतली. त्यातील ज्यांच्या शाळा २०२२ मध्ये सोप्या क्षेत्रात आल्या, त्यांच्या सध्याच्या क्षेत्राची उपस्थिती ३० जून २०२२ हवी. ज्यांची नाही, त्यांची चौकशी होणे अपेक्षित आहे.  

आक्षेपांचे निरसन केले अहवाल वरिष्ठांकडे
शालेय शिक्षण विभागाने उपोषणकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्यांचे शंकानिरसन केले आहे. बदल्यांमध्ये अनियमितता झालेल्या प्रकरणांची चौकशी केली असून, निर्णयासाठी वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्यात आल्याचेही प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

आजपासून उपोषण
त्यासाठी २२ सप्टेंबरपासून विभागीय आयुक्तालयासमोर समिती बेमुदत उपोषण करणार आहे. समितीने १८ ऑगस्टला धरणे आंदोलनही केले होते. त्याची दखल घेतली नसल्यामुळे उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे संघटनेने सांगितले. या उपोषणाच्या ठिकाणी अन्यायग्रस्त शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे जिल्हाध्यक्ष  विजय साळकर, नितीन नवले, शामभाऊ राजपूत,  सतीश कोळी, बबन चव्हाण, आदींनी केले आहे.

Web Title: Disruption in teacher transfers, release stopped; Revenue Additional Commissioner orders inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक