Disha Salian Case:शिवसेना(उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. दिशाची हत्या किंवा तिच्यावर कोणत्याही प्रकारचा लैंगिक अत्याचार झाल्याचे वैद्यकीय पुराव्यांतून सिद्ध झाले नाही, अशी माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी उच्च न्यायालयात दिली. दिशा सालियनच्या वडिलांनी केलेल्या याचिकेत आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप करण्यात आला होता. दिशाची हत्या झाल्याचा आणि त्यापूर्वी तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा दावा करुन, या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचा 8 जून 2020 रोजी मुंबईतील मालाड परिसरातील एका निवासी इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर शहर पोलिसांनी अपघाती मृत्यू अहवाल (एडीआर) नोंदवला होता. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी या वर्षी मार्चमध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये त्यांच्या मुलीच्या मृत्यूची केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशी करावी आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करावा, अशी मागणी केली होती.
दिशावर कुठल्याही प्रकारचा अत्याचर नाहीमात्र, दिशा सालियनने स्वतःच्या इच्छेने फ्लॅटच्या खिडकीतून उडी मारली होती. पोस्टमॉर्टम अहवालात तिच्यावर लैंगिक किंवा शारीरिक हल्ल्याचे कोणतेही चिन्ह नसल्याचे पोलिसांनी उच्च न्यायालयासमोर दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले. कुटुंबाशी झालेल्या वादामुळे आणि तिचे व्यवसायिक व्यवहार व्यवस्थित होत नसल्याने ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती, असेही पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
याप्रकरणी तपासाची प्राथमिक फेरी पूर्ण झालेली आहे. दिशाचा मृत्यू हा अपघाती असून, त्यात कोणताही घातपाच किंवा हत्येचा प्रयत्न झाल्याचं आढळून आले नाही. म्हणून दिशाच्या मृत्यूची अपघाती नोंद करत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत मालवणी पोलीस ठाण्यातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी प्रतिज्ञापत्र सादर करीत याचिका फेटाळून लावण्याची विनंती हायकोर्टाकडे केली आहे.
फडणवीसांनी आदित्य ठाकरेंची माफी मागावीदिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंना क्लीनचीन मिळाल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली. 'दिशा सालियन प्रकरणात पोलिसांचा क्लिन चिट रिपोर्ट आला आहे. हे पोलिस आमचे नाहीत, एसआयटी आमची नाही ती तुम्हीच स्थापन केली होती. आदित्य ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आहेत. त्यांनी मंत्री म्हणून चांगले काम केले. त्यांचे नेतृत्व खच्ची करण्याचे काम केले. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांचे पुत्र नितीश राणे, इतर भाजप नेते, एकनाथ शिंदे, या सर्वांनी शिवसेना (यूबीटी) आणि आदित्य ठाकरे यांची माफी मागावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.