वांद्रे क्रॉस केले तितक्यात उद्धव ठाकरेंचा फोन आला, म्हणाले...; नारायण राणेंचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2025 17:21 IST2025-03-22T17:16:42+5:302025-03-22T17:21:26+5:30
सचिन वाझे या प्रकरणात कर्ता करविता, त्याला जेलमधून बाहेर काढा, ४ फटके देताच सगळे सांगेल असं राणे यांनी म्हटलं.

वांद्रे क्रॉस केले तितक्यात उद्धव ठाकरेंचा फोन आला, म्हणाले...; नारायण राणेंचा दावा
मुंबई - दिशा सालियन प्रकरणात माजी मंत्री आदित्य ठाकरे पुन्हा अडचणीत आले आहेत. दिशावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली असा दावा करत तिच्या कुटुंबाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी नारायण राणे यांनीही आदित्यसाठी उद्धव ठाकरेंचा फोन आल्याचा दावा केला आहे.
आज भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी फोनबाबतचा खुलासा केला. राणे म्हणाले की, जुहूला जात असताना वांद्रे क्रॉस केले, तेवढ्यात मला एक फोन आला. मिलिंद नार्वेकरांनी फोन केला होता, ते म्हणाले, दादा, साहेबांना बोलायचंय. मी म्हटलं कोण साहेब, तर ते म्हणाले उद्धवजी..मग त्यांना फोन दिला. मी म्हटलं जय महाराष्ट्र साहेब..बोला, ते म्हणाले, तुम्हाला मुले आहेत, मलाही मुले आहेत. सध्या तुम्ही जे पत्रकार परिषदेत बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्यात त्याचा उल्लेख करू नये. म्हणून विनंती करायला फोन केला असं उद्धव ठाकरे माझ्याशी बोलले. मी त्यावर बोललो, उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा, एकतर मी अमुक ठिकाणी कोण आहे याचा उल्लेख मी केला नाही. निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे मी म्हणतोय. त्यातील दोषींना अटक व्हावी असं मी म्हणतोय. त्यात तडजोड नाही. फक्त तुम्ही जे तुमच्या मुलाचं नाव घेतले, तो संध्याकाळी तिथे जातो, त्याला सांभाळा. ते बरोबर नाही हे सांगा. जुहूला माझ्या घराजवळ दिनो मोरिया राहतो, हे काय धुमाकूळ घालतात मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही त्याला सांभाळा असं मी बोललो. त्यावर मी पाहतो, पण तुम्ही जरा सहकार्य करा असं म्हटल्यावर मीदेखील ठीक आहे बोलून फोन ठेवला असं त्यांनी सांगितले.
त्यानंतर दुसरा फोन कोविड असताना आला. माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन होते, तेव्हा राज्य सरकारकडे एक परवानगी घ्यायची होती. त्यावेळी मला फोन आला, म्हटले, तुम्ही फोन केला होता, तेव्हा मी बोललो कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता. त्यावर त्यांनी ते मिळेलच असं बोलले. त्यावेळीही प्रेस घेताना तुम्ही उल्लेख टाळला तर बरे होईल. मी म्हटलं मी नाव घेतले नाही. एक मंत्री होता असं मी म्हणतोय, ते व्हिडिओत आलंय असे २ फोन उद्धव ठाकरेंनी केले होते असं नारायण राणेंनी म्हटलं.
दरम्यान, दिशा सालियनच्या वडिलांवर दबाव होत्या, किशोरी पेडणेकर त्यांच्या घरी गेल्या होत्या. मनात नसतानाही नकाराला होकार म्हणावं लागायचे. त्यावेळी पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा त्यांना मदत करत नव्हते. डॉक्टर बदलले गेले. जो काही प्रकार झाला ते दडपण्यासाठीच झाला. म्हणूनच दबाव कमी झाल्याचं कळल्यावर ते कोर्टाकडे गेले. या प्रकरणात सरकारने सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार त्वरील अटक करून चौकशी करायला हवी. मुंबई पोलिसांनी का अटक केली नाही. वाझे जेलमध्ये आहे, त्याला ४ फटके दिले तर तो सगळं सांगेल. त्याचा कर्ता करविता वाझे आहे. सालियन कुटुंबावर खूप दबाव होता. कोर्ट आता या प्रकरणावर जो निर्णय देईल, परंतु आतापर्यंत जे समोर आलंय त्यावरून एफआयआर दाखल करावा अशी मागणी राणेंनी सरकारकडे केली.