उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना थोडीतरी लाज, शरम असती तर...; रामदास कदमांचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 20:52 IST2025-03-20T20:50:12+5:302025-03-20T20:52:43+5:30
कोण तो दिनो, कोण आदित्य पांचाळी त्यांचे आदित्य ठाकरेंशी संबंध काय, या सगळ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. दिशा सालियन या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. दूध का दूध, पानी का पानी होणे आवश्यक आहे असं रामदास कदम यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना थोडीतरी लाज, शरम असती तर...; रामदास कदमांचा हल्लाबोल
मुंबई - दिशा सालियान हिच्या मृत्यूनंतर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. नारायण राणे यांनी जाहीरपणे आदित्य ठाकरेंचा या घटनेशी संबंध असून माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत असं सांगितले होते. दुर्दैवाने आतापर्यंत ते कुठलेही पुरावे देऊ शकले नाहीत. मात्र दिशा सालियनच्या वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली. त्यात आदित्य ठाकरे यांचे नाव घेत त्याच्यासोबत तिघांनी मिळून माझ्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला अशी याचिका दाखल केली आहे. ही बाब इतकी गंभीर आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आदित्य ठाकरे याच्यावर बलात्काराचा आरोप होतोय, ही चांगली बाब नाही असं सांगत शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
रामदास कदम म्हणाले की, ज्या बाळासाहेबांनी मराठी मुलींची इज्जत, अब्रू वाचवली. त्यासाठी भगवा झेंडा खांद्यावर घेत पक्ष काढला. त्या बाळासाहेबांच्या नातवावर बलात्काराचे आरोप होतायेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना थोडीतरी इज्जत, लाज, शरम असती तर तोंडाला काळे फासून देश सोडून गेले असते. अनेक गोष्टी अशा होतात पण त्याचे पुरावे मिळत नाही. उद्धव ठाकरे ज्यावेळी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी पोलिसांशी हाताशी धरून पुरावे नष्ट केलेत का याची माहिती घेणे आवश्यक आहे अशी मागणी त्यांनी केली.
तसेच उद्धव ठाकरे यांनी नारायण राणेंना फोन केला, तुमची मुले आहेत तसा माझा मुलगा आहे अशी चर्चा मी ऐकली. सत्यता किती नारायण राणे सांगतील. मात्र ही बाब महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. आदित्य ठाकरे रात्री ११ वाजता बाहेर पडतो, पहाटे ५ वाजता घरी येतो. हा रात्रभर नेमका कुठे असतो. कोण तो दिनो, कोण आदित्य पांचाळी त्यांचे आदित्य ठाकरेंशी संबंध काय, या सगळ्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. दिशा सालियन या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. दूध का दूध, पानी का पानी होणे आवश्यक आहे असं रामदास कदम यांनी म्हटलं.
दरम्यान, या महाराष्ट्रात मुलींची अब्रू सुरक्षित नसेल, त्यांचे खून होत असतील आणि ठाकरे कुटुंबावर आरोप होत असेल तर उद्धव ठाकरे देशाच्या पंतप्रधानांवर बोलतात, अमित शाहांवर बोलतात. एकनाथ शिंदेंवर बोलतात. वारेमाप देवेंद्र फडणवीसांवर बोलतो त्यांना बोलण्याचा अधिकार आहे का? मातोश्री बाहेर पडण्याचाही नैतिक अधिकार नाही. दिशा सालियनचे वडील कोर्टात गेलेत, कोर्ट काय आदेश देते ते पाहू. कोर्टाने चौकशीचे आदेश दिले तर सखोल चौकशी झाली पाहिजे. जे काही खरे आहे ते बाहेर आणले पाहिजे. बाळासाहेब गेल्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे धंदे काय सुरू आहेत हे महाराष्ट्रालाही कळले पाहिजे असंही रामदास कदम म्हणाले.