दिशा सालियान मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप, उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 18:02 IST2025-03-20T17:54:54+5:302025-03-20T18:02:13+5:30
Disha Salian Case: सुमारे पाच वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालियान या तरुणीच्या मृत्युप्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत युवासेनाप्रमुख आणि राज्या सरकारमधील माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. आता या प्रकरणात उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

दिशा सालियान मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप, उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात विषय संपवला, म्हणाले...
सुमारे पाच वर्षांपूर्वी झालेल्या दिशा सालियान या तरुणीच्या मृत्युप्रकरणी तिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत युवासेनाप्रमुख आणि राज्या सरकारमधील माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. या मुद्य्यावरून आज विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ झाला. एकीकडे या प्रकरणाच्या चौकशीवरून सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून आग्रही मागणी होत असतानाच दुसरीकडे ठाकरे गटानेही आपल्या युवानेत्यावर होत असलेल्या आरोपांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आदित्य ठाकरे यांनी समोर येत या आरोपांबाबत कोर्टात उत्तर देऊ अशी स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता आदित्य ठाकरे यांचे वडील आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.
दिशा सालियान मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंवर झालेल्या आरोपांबाबत प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आमचं घराणं, आमच्या घराण्याचा सहा सात पिढ्या ह्या जनतेसमोर आहेत. त्यामुळे या विषयात काही तथ्य नाही आहे. दूर दूर तक कोई संबंध नही, म्हणतात त्याप्रमाणे या प्रकरणाशी दुरान्वयानेही संबध नाही आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिशा सालियान प्रकरणावरून बेछूट आरोप करत असलेल्या विरोधकांनाही इशारा दिला. राजकारण जर या वाईट बाजूने न्यायचं असेल, तर मग मात्र सगळ्यांचीच पंचाईत होईल, कारण खोट्याचा जर तुम्ही नायटा करणार असाल, तर ते तुमच्यावरही बुमरँग होऊ शकेल, हेच या लोकांना सांगतो, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, दिशा सालियान प्रकरणी झालेल्या आरोपांबाबत आपली बाजू मांडताना आदित्य ठाकरे म्हणाले की, पाच वर्षे सातत्याने बदनामीचा प्रयत्न होत आहे हे प्रकरण कोर्टात आहे त्यामुळे कोर्टातच बोलू. माझ्यावरून सभागृह बंद पाडले जात आहे. पाच वर्षापासून हेच चालू आहे. पण कोर्टात जे होईल ते होईल. पाच वर्षापासून मी यावर मुद्द्याचं बोलत आलेलो आहे आणि बोलत राहणार, असे आदित्य ठाकरे यांनी ठामपणे सांगितले होते.