नागपूर मनपाच्या निवडणुकीबाबत फडणवीस-गडकरींच्या उपस्थितीत मंथन, सारासार विचार करूनच उमेदवारी देण्याची सूचना
By योगेश पांडे | Updated: December 21, 2025 22:29 IST2025-12-21T22:27:07+5:302025-12-21T22:29:54+5:30
Nagpur Municipal Corporation Elections 2025: नगरपरिषद निकाल जाहीर झाल्यावर नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी नागपूर महानगरपालिका निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत यावेळी मनपा निवडणुकीच्या तयारीबाबत मंथन करण्यात आले.

नागपूर मनपाच्या निवडणुकीबाबत फडणवीस-गडकरींच्या उपस्थितीत मंथन, सारासार विचार करूनच उमेदवारी देण्याची सूचना
- योगेश पांडे
नागपूर - नगरपरिषद निकाल जाहीर झाल्यावर नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी नागपूर महानगरपालिका निवडणूकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत यावेळी मनपा निवडणूकीच्या तयारीबाबत मंथन करण्यात आले. यावेळेला इच्छुकांच्या अर्जांचा पाऊस पडला असल्याने सारासार विचार करूनच उमेदवारी देण्याची सूचना यावेळी नेत्यांकडून करण्यात आली.
सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीला नागपूर महानगरपालिका निवडणूकीत पक्षाचे प्रभारी आ.प्रवीण दटके, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यासोबतच भाजपच्या कोअर कमिटीचे व कार्यकारिणीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री व गडकरी यांनी अगोदर नागपूर महानगरपालिका निवडणूकीच्या तयारीसंदर्भात पदाधिकाऱ्यांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. मुलाखतीची एकूण प्रक्रिया व त्यातील एकूण निष्कर्षदेखील मांडण्यात आले. सारासार विचार करूनच उमेदवारी देण्याची सूचना यावेळी नेत्यांकडून करण्यात आली. तसेच कुठल्याही प्रकारचा अति आत्मविश्वास न दाखविता तळागाळात जाऊन संपर्क साधण्याचे नियोजन करण्यास सांगण्यात आले.
काही नावांवर चर्चा
यावेळी नेत्यांच्या उपस्थितीत काही प्रभावी असलेल्या इच्छुकांच्या नावावरदेखील चर्चा करण्यात आली. त्यांच्या प्रभागातील एकूण इच्छुक, त्यांची मागील कामगिरी व भविष्यात जनतेला घेऊन चालण्याची क्षमता यावर मंथन झाले. नेत्यांनी त्यावर त्यांची मते मांडली.
सर्वेक्षणाची आकडेवारीदेखील केली सादर
यावेळी पक्ष पदाधिकाऱ्यांनी नेत्यांसमोर प्रभागांमधील सर्वेक्षणाची आकडेवारीदेखील सादर केली. तसेच पक्षाच्या कार्यकारिणीच्या सदस्यांची मतेदेखील जाणून घेण्यात आली. आमचीनागपूर महानगरपालिकेच्या निवडणूकीबाबत सविस्तर चर्चा झाली. कोअर टीमचे मतदेखील विचारात घेण्यात आले. काही नावांवरदेखील चर्चा झाली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.